नवी दिल्ली – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला आज ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी आहे. बुधवारी भारताचा सामना मालदीवशी होत असून त्यात छेत्रीने एक गोल केला तर तो पेले यांचा विक्रम मोडून आपल्या नावावर ही कामगिरी नोंदवेल.
सॅफ फुटबॉल स्पर्धेत नेपाळविरुद्धच्या सामन्यात छेत्रीने गोल केल्यानंतर पेले यांची बरोबरी केली होती. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पेले यांनी केलेल्या 77 गोलची छेत्रीने बरोबरी केली होती.
छेत्रीने 123 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 77 वा गोल केला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत छेत्री तिसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीसोबत युएईच्या अली मबखौतच्या नावावरही 77 गोल आहे. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा मेस्सी छेत्रीच्या पुढे आहेत.
रोनाल्डोच्या नावावर 112 तर मेसीच्या नावावर 79 गोल आहेत.सॅफ फुटबॉल सामन्यातील गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मालदीव 6 गुणांसह पहिल्या, नेपाळ 6 गुणांसह दुसऱ्या, तर भारत 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा आज (बुधवार) मालदीवशी सामना होणार आहे.