अनेक कॅमेरे नादुरुस्त : शिक्षण विभागाची उदासीनता
पिंपरी (प्रतिनिधी) – शाळेमध्ये मुलींच्या छेडछेडीचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना गंभीर स्वरुपाची मारहाण केली जाते. या सर्व गोष्टींवर वचक ठेवण्यासाठी अनेक शाळांमध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाले आहे. कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारावर असताना या ठेकेदाराला खुली सूट देण्यात आली आहे.
अडीच-तीन वर्षांपूर्वी तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून बसविण्यात आलेले बहुतांश कॅमेरे बंद पडल्याने एवढी मोठी रक्कम पाण्यात जाण्याशी शक्यता निर्माण झाली आहे. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यानंतर जुन्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्याऐवजी शिक्षण मंडळ सदस्य आणि अध्यक्षांनी मात्र नव्या कॅमेऱ्यांच्या खरेदीबाबत चर्चासुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. या घटना रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे यापूर्वी बसविण्यात आले होते. त्यामुळे छेडछाडीच्या घटनांवर वचक बसेल अशी अपेक्षा होती मात्र फोल ठरली आहे. प्राथमिक विभागात 87 शाळा असून त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करून 350 हून अधिक कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, अनेक शाळांमधील कॅमेरे नादुरुस्त असल्याने ते केवळ शो पिस म्हणूनच शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तात्कालीन खरेदी करतेवेळी ठेकेदाराने बसवलेले कॅमेरे किमान चार वर्ष सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ठेकेदारावर देण्यात आली होती.
शिक्षण मंडळाचा खरेदीचा धमाका
नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये टॅब खरेदी करणे, तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करणे, इतर साहित्य डीबीटी तत्त्वावर न घेता निविदा राबवून घेणे या विषयांना मंजुरी दिली. त्यामुळे शिक्षण मंडळाची विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणातील प्रगतीपेक्षा खरेदीवरच अधिक जोर असल्याचेच स्पष्ट होत आहे.