करोनाबाधित मातांनी स्तनपान करणे सुरक्षित

पुणे – करोना बाधित मातांनी स्तनपान करणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिला आहे. मात्र, त्यासाठी काही सुरक्षेचे उपायही सुचवण्यात आले आहेत.

करोना बाधित मातेने बाळाला स्तनपान करावे; परंतु इतर वेळी तिने बाळापासून सहा फुटाचे अंतर राखावे, असे उपायांमध्ये सूचवण्यात आले आहे. गर्भवती आणि स्तनदा महिलांचे लसीकरण, करोना बाधित स्तनदा माता, नवजात बाळांचे संगोपन आणि त्यांना अंगावरचे दूध द्यावे किंवा नाही याविषयी असलेल्या अनेक शंकांचे, प्रश्‍नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने केला आहे.

आईला करोनाची बाधा झाली असली, तरी जी मुले आईच्या दुधावरच अवलंबून आहेत; त्यांना त्याच्या त्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे बाधित मातांनी बाळांना स्तनपान करावे, परंतु तेवढ्याच काळापुरते त्यांनी बाळाला कुशीत घ्यावे, असे सुचवण्यात आले आहे.
बाधित आईने स्तनपान करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत, मुखपट्टीचा (मास्क) वापर करावा, परिसर निर्जंतुक करून घ्यावा. स्तनपानानंतर अन्यवेळी या बाळाची काळजी करोनाबाधित नसलेल्या घरातील व्यक्तींनी घ्यावी आणि त्याला बाधित मातेपासून लांब ठेवावे.
जर बाळाला सांभाळण्यासाठी घरात आणखी कोणी नसेल, तर त्या मातेने पूर्णवेळ मुखपट्टी लावावी, तसेच वारंवार हात स्वच्छ धुवावेत, बाळाला जास्तवेळ जवळ घेऊ नये, स्तनपानव्यतिरिक्त त्याला शक्‍यतो लांब ठेवावे, असेही कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे सांगण्यात आले आहे.

करोनाचा काळ संपल्यानंतर अनेक मातांना “डीप्रेशन’ येण्याची शक्‍यता असते. अशावेळी त्यांच्या वर्तनात बदल होतो. याकडे कुटुंबियांनी लक्ष दिले पाहिजे. अनेक मातांना मानसोपचाराचीही गरज लागू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.