सईद आणि अजहर ठरणार भारताकडून सर्वप्रथम घोषित होणारे दहशतवादी

नवी दिल्ली -दहशतवादविरोधी कायद्यातील सुधारणा अंमलात आल्यानंतर नापाक कारवाया करणाऱ्यांना भारताकडून दहशतवादी म्हणून घोषित केले जाणार आहे. भारताकडून सर्वप्रथम हाफिज सईद आणि मसुद अजहर या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर तो शिक्का मारला जाईल, असे सूचित होत आहे.

लोकसभेत नुकतेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. आता ते विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची प्रतीक्षा आहे. त्या विधेयकावर संसदेचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर सईद आणि अजहर यांना सर्वांत आधी दहशतवादी म्हणून घोषित केले जाईल, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुत्रांनी दिली. दहशतवादी म्हणून घोषित केले जाणाऱ्याची मालमत्ता जप्त करण्याचा आणि त्याच्यावर प्रवास बंदी घालण्याचा अधिकार संबंधित विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाल्यानंतर मिळेल.

त्या अधिकाराचा वापर भारताकडून सईद आणि अजहर या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांविरोधात सर्वप्रथम केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सईद हा मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार आहे. तर अजहरच्या पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेने काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्‍मीरात आत्मघाती हल्ला घडवला. त्यांच्यावर पाकिस्तानने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारताकडून सातत्याने केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.