नवी दिल्ली – मी लोकांची स्वच्छतागृहे साफ करण्यासाठी खासदार झालेली नाही असे विधान भाजपच्या वादग्रस्त खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. त्यातून त्यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमेचीच थट्टा केल्याचा अर्थ लावला गेला होता. त्यावरून भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
त्यांना आज भाजप मुख्यालयात बोलावून घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या या विधानावर पक्षाचे नेतृत्व नाराज असल्याचे सांगण्यात आले. मध्यप्रदेशात सेहोर येथे बोलताना साध्वींनी हे विधान केले होते. पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमांची अप्रतिष्ठा होंईल अशी विधाने करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
भाजप मुख्यालयातून बाहेर जाताना पत्रकारांनी त्यांना गाठले पण त्यावेळी प्रज्ञासिंह यांनी कोणतीही प्रतिक्रीया देणे टाळले. सेहोर येथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या काही लोकांशी बोलताना संडास साफ करणे किंवा एकूणच साफसफाई करणे हे आमचे काम नाही, त्यासाठी मी निवडून आलेले नाही हे लक्षात ठेवा असे प्रज्ञासिंह यांनी त्या लोकांना बजावले होते. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्ञासिंह यांनी मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमेवरच टीका केल्याचा दावा केला जाऊ लागला होता. त्यामुळे त्यांना आज पक्षाच्या मुख्यालयात बोलावून समज देण्यात आली.