साध्वी प्रज्ञासिंह भाजप मध्ये; भोपाळ मधून निवडणूक लढवणार

भोपाळ – मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्या आता भोपाळ मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी आज स्वताच पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आपण भोपाळ मधून ही निवडणूक लढवू आणि ती जिंकूनही दाखवू असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेश मुख्यालयात त्यांनी आज माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची भेट घेतली तसेच भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या की भोपाळ मधील निवडणूक मला अवघड जाईल असे अजिबात वाटत नाही. साध्वी प्रज्ञासिंह यांनी या आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विश्‍व हिंदु परिषदेची दुर्गा वाहिनी या संघटनांमध्ये काम केले आहे. त्या संघ परिवाराच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत.

मात्र सन 2008 मध्ये मालेगावात झालेल्या बॉंबस्फोटात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून लेफ्टनंट कर्नल पुरोहित हेही या प्रकरणातील सहआरोपी आहेत. तथापी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात आली आहे. भोपाळ मध्ये त्यांची लढाई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्याशी होणार आहे. सन 1989 पासून भारतीय जनता पक्षाने भोपाळ मतदार संघातून सातत्याने विजय मिळवला आहे. या मतदार संघात अल्पसंख्याकांची संख्याही मोठी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.