साध्वी प्रज्ञासिंह एनआयए कोर्टापुढे हजर

मुंबई: भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि मालेगाव बॉंम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह या आज विशेष एनआयए कोर्टापुढे उपस्थित राहिल्या. गेली अकरा वर्ष त्यांच्या वरचा हा खटला सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भोपाळ मधून विजयी झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच या खटल्याच्या सुनावणीला आज उपस्थित राहिल्या. या आधी त्या ऑक्‍टोबर महिन्यात आरोप निश्‍चीतीच्या संबंधातील सुनावणीला उपस्थित राहिल्या होत्या.

खटल्यातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहिले पाहिजे असे फर्मान न्यायाधिश व्ही. एस. पडळकर यांनी काढले आहे. अनुपस्थित राहण्याविषयीचे सबळ कारण कोर्टापुढे दिल्यानंतरच संबंधीत आरोपीला सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्याची अनुमती दिली जाईल कोर्टाने स्पष्ट केले आहे.
आपण खासदार झाल्यामुळे त्या विषयीची औपचारीकता पुर्ण करण्यासाठी आपल्याला या सुनावणीला अनुपस्थित राहण्यास अनुमती द्यावी अशी मागणी साध्वी प्रज्ञासिंह यांनी कोर्टापुढे केली होती. पण त्यांना ती परवानगी नाकारण्यात आली.

गुरूवारी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. त्यावेळी आपल्याला रक्तदाब असल्याने भोपाळहून मुंबईला येणे आपल्या अशक्‍य असल्याचे साध्वींनी आपल्या वकिलांमार्फत न्यायालयाला कळवले होते. त्यानुसार कोर्टाने त्यांना गुरूवार ऐवजी शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्यास सांगितले होते त्यानुसार त्या आज उपस्थित राहिल्या. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण सात जणांवर आरोपपत्र दाखल आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.