राजस्थानमध्ये चाऱ्याची टंचाई

बारमेर – चाऱ्याची कमतरता आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राजस्थानच्या साधूंनी गुरुवारी (13 जून) गायीची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले साधू आणि नागरिक “जय गौ माता, जय गोपाला’ अशा घोषणा देत होते.

बारमेर आणि जैसलमेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कमतरता आहे. मागच्या महिन्याभरात या दोन जिल्ह्यांत उपासमारीमुळे गायींचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे. या विषयावर लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान मोदींना एक लाख पत्रे पाठवण्याची साधूंची योजना आहे. चाऱ्याच्या कमतरतेसाठी राज्य सरकार केंद्राला जबाबदार ठरवत आहे. एनडीआरएफच्या नियमांमुळे चारा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

राज्य सरकारने 518 चारा डेपोंना मान्यता दिली आहे. त्यातील 412 चारा डेपो चालू आहेत, अशी माहिती बारमेरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राकेश कुमार यांनी दिली. पश्‍चिम राजस्थानात उच्च तापमान, चाऱ्याची कमतरता आणि पाण्याच्या समस्येमुळे गायींचा मृत्यू होत आहे, असे अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर मागच्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे साधूंनी गायीची अंत्ययात्रा काढून समस्येकडे लक्ष वेधले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.