हडपसर(प्रतिनिधी) : हडपसर येथील साधना सहकारी बँकेस पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे ‘उत्कृष्ट एन.पी.ए. व्यवस्थापन व प्रशिक्षण कार्यक्रमातील सर्वाधिक सहभाग’ असे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या उपस्थितीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
असोसिएशनच्या वतीने दरवर्षी निव्वळ NPA चे 3% पेक्षा कमी प्रमाण राखणाऱ्या बँकांना वरील पुरस्कार देण्यात येतो. साधना बँकेने सन 2019-20 व सन 2021-22 या वर्षात निव्वळ NPA चे प्रमाण 3% पेक्षा कमी राखल्यामुळे बँकेस हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.असे चेअरमन अनिल तुपे यांनी सांगितले. तसेच असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधील जास्तीत जास्त सहभागाबद्दल सुद्धा पुरस्कार साधना बँकेस प्राप्त झालेला आहे.
बँकेने निव्वळ NPA चे प्रमाण 3% पेक्षा कमी राखल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे, अधिकारी व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन व कौतुक केले. दोन्हीही पुरस्कार बँकेच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाने स्विकारले. त्यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक व वसुली अधिकारी उपस्थित होते.