नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ समाजसेवक सदानंद फुलझेले यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. आनंद, डॉ. सुधीर आणि सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत असल्याने सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सदानंद फुलझेले हे आजारी होते. आज सकाळी 9.30 वाजता धरमपेठ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फुलझेले यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. फुलझेले नागपूरचे उपमहापौर होते.
तसेच रामदासपढ वॉर्डाचे नगरसेवकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे ते आयोजक होते. तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते सचिव होते.
दरम्यान, फुलझेले यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.