जत : राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
गोपीचंद पडळकरांना निवडून देण्याचे केले आवाहन
गोपीचंद पडळकर जतमधून विधानसभा लढवत आहेत. त्यांना या विधानसभा निवडणुकीत निवडून द्या. जतचा विकास करून जत एक नंबरवर नेतो. येथील दुष्काळ हटवतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.