मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि रियाझ काझी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. तसेच याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 30 दिवसांचा अवधी देत न्यायालयाने गुरूवारी तपासयंत्रणेला मोठा दिलासा दिला आहे.
मुकेश अंबानी यांच्या “अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेले एक बेवारस वाहन आढळले होते. यानंतर काही दिवसांतच त्या वाहनाचा मालक मनसुख हिरेन यांचाही मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.
तपासयंत्रणांना कोणत्याही प्रकरणात 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र तपासयंत्रणा यात अपयशी ठरल्यामुळे आपल्याला डीफॉल्ट जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत सचिन वाझेसह अन्य दोन पोलीस अधिका-यांनी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.