सचिन वाझे प्रकरण : अनिल देखमुख यांची साडेआठ तास चौकशी

मुंबई  – सचिन वाझे खंडणीप्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी संपली आहे. सीबीआयने आज तब्बल साडे आठ तास त्यांची कसून चौकशी केली. यावेळी सीबीआयने त्यांना अनेक प्रश्न विचारल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशमुख यांनी यावर काहीही भाष्य न केल्याने चौकशीचे गूढ वाढले आहे.

सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली.

सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. तब्बल साडे आठ तास ही चौकशी चालली. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यापूर्वी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरे, सिंह यांचे पत्र आणि कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांच्या आधारे सीबीआयने ही प्रश्नावली तयार केली होती. त्यावरून देशमुख यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या. सीबीआयने अत्यंत कसून ही चौकशी केली. मात्र, या चौकशीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. तसेच देशमुख यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात आले का? हे सुद्धा कळू शकले नाही.

दरम्यान, सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून 15 दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.