मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदाच्या रोड सेफ्टी क्रिकेट सिरीजच्या मोसमातून माघार घेतल्याचे खरे कारण आता समोर आले आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात सचिनसह अन्य काही खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, यापैकी एकाही खेळाडूचे पैसे आयोजकांनी अद्याप दिलेले नाहीत त्यामुळेच सचिनसह या काही खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या सिरीजमध्ये खेळतात. या सिरीजचा भाग असणाऱ्यांना अजून पहिल्या मोसमाचे पैसे मिळालेले नाहीत. सचिन इंडिया लिजिंड्स संघाकडून खेळला होता. या संघानेच विजेतेपदही पटकावले होते.
खालेद महमुद, खालेद मसहुद, मेहराब होसैन, नफीस इक्बाल यासह आणखी काही बांगलादेशी खेळाडूंनाही अजून पैसे मिळालेले नाहीत. या स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचा सचिनच ब्रॅंड अम्बॅसेडर होता.
गावसकर होते स्पर्धा संचालक
विक्रमादित्य सुनील गावसकर हे या स्पर्धेच्या समितीचे संचालक होते. अर्थात ते केवळ मानद संचालक असल्याचे आयोजकांनी सांगितले होते. मात्र, तरीही त्यांनी या प्रश्नावर मौन सोडायला हवे होते. आता त्यांनीही या पदावर राहण्यासाठी नकार दिला आहे. यंदाची स्पर्धा येत्या 1 ते 19 मार्च या कालावधीत अमिरातीत होणार आहे.
2020 साली पहिल्यांदा ही स्पर्धा झाली व त्यावेळी प्रत्येक खेळाडूला स्पर्धेच्या एकूण नफ्यातील 10 टक्के रक्कम देण्याचे ठरले होते. 25 फेब्रुवारी 2021 सालापर्यंत 40 टक्के रक्कम देण्यात येणार होती व 31 मार्च 2021 सालापर्यंत उर्वरित रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत कोणत्याही रकमेचे हस्तांतरण झालेले नाही, असेही सांगितले जात आहे.