लंडन : आयसीसी वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना हा अविश्वसनीय आणि रोमाचंक असा ठरला. अटीतटीच्या या सामन्यात इंग्लडचा संघ जगज्जेता ठरला. या विश्वचषक स्पर्धेत अनेक नवे विक्रम झाले. जुन्या विक्रमांना मागे टाकत अनेकांनी ऐतिहासिक कामगिरी केली. पण यामध्ये असा एक विक्रम जो विश्वचषकाच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने केला आहे तो मात्र यदांच्या स्पर्धेत कोणालाही मोडता आला नाही. विश्वचषक स्पर्धेत सचिनचा सोळा वर्षांपुर्वीचा विक्रम तुटेल असे वाटले होते पण तसे घडले नाही.
सचिनने 2003 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या. यावेळी भारताचा रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांच्याकडे सचिनचा विक्रम मोडण्याची संधी होती. हे दोन्ही फलंदाज सचिनच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले देखील होते. पण त्यांना तो मोडता आला नाही. रोहित शर्माने स्पर्धेत सर्वाधिक 648 तर वॉर्नरने 647 धावा केल्या.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन आणि इंग्लडचा फलंदाज जो रुटला सचिनचा विक्रम तोडण्याची संधी होती. पण या दोघांना फायनलमध्ये सचिनचा विक्रम मोडणारी मोठी खेळी करता आली नाही. विलियम्सनने अंतिम सामन्यात 30 आणि तर रूटने 7 धावाच केल्या.
त्यामुळे आता सचिनचा विक्रम कोणाला मोडायचा असेल तर त्यांना पुढच्या म्हणजेच 2023मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची वाट पहावी लागणार आहे.