सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

डोनाल्ड व फिट्‌झपॅट्रिक यांच्यासमवेत आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान

लंडन – भारताचा आदर्श विक्रमवीर सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड यांच्याबरोबरच त्यालाही आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियास महिलांचा विश्‍वचषक जिंकून देणाऱ्या ज्येष्ठ खेळाडू कॅथरीन फिट्‌झपॅट्रिक यांनाही हा सन्मान मिळाला आहे.

जगातील सर्वोत्तम शैलीदार फलंदाज म्हणून ख्याती मिळविलेल्या सचिनने नोव्हेंबर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कसोटी व एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने मिळविला. त्याने कसोटीत 15 हजार 921 धावा तर एक दिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत.

आफ्रिकेच्या द्रुतगती माऱ्याची जबाबदारी सांभाळणारे डोनाल्ड यांनी कसोटीत 330 विकेट्‌स तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 272 विकेट्‌स घेतल्या आहेत. स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटविला आहे. ते म्हणाले, जेव्हा मला हा सन्मान मिळाल्याचा संदेश आयसीसीकडून आला, तेव्हा मला क्षणभर आश्‍चर्याचा धक्काच बसला. हा मान मला मिळेल अशी मी कधी अपेक्षाही केली नव्हती. माझ्या क्रिकेट वाटचालीत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला मदत केली अशा सर्व प्रशिक्षक व सहकाऱ्यांचा मी शतश: आभारी आहे.

फिट्‌झ पॅट्रिक यांनी 16 वर्षांच्या कारकिर्दीत 109 एकदिवसीय सामन्यांमध्ये 180 विकेट्‌स घेतल्या आहेत. तेरा कसोटीत भाग घेताना त्यांनी 60 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियास दोन वेळा आयसीसी विश्‍वचषक जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही नावलौकिक मिळविला आहे.

भारताचा सहावा खेळाडू

हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळविणारा सचिन हा भारताचा सहावा खेळाडू आहे. यापूर्वी बिशनसिंग बेदी, कपिलदेव, सुनील गावसकर (सर्व 2009), अनिल कुंबळे (2015) व राहुल द्रविड (2018) यांना हा मान मिळाला आहे.

भारतीय क्रिकेटचा गौरव

सचिनने सांगितले, हॉल ऑफ फेममध्ये स्थान हा माझा सन्मान नसून भारतीय क्रिकेट क्षेत्राचाच गौरव आहे. या यशाचे श्रेय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, मुंबई क्रिकेट संघटना यांनी दिलेल्या पाठबळास द्यावे लागेल. त्याचप्रमाणे माझे गुरू रमाकांत आचरेकर, माझ्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणारे माझे कुटुंबीय यांना श्रेय दिले पाहिजे. मी ज्या ज्या संघांकडून खेळलो, त्या त्या संघांचे कर्णधार व अन्य सहकाऱ्यांना विसरणे शक्‍य नाही. त्यांचेही माझ्यावर मोठे ऋण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)