मुंबई – उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी, मैदानावर गैरवर्तन, सराव सत्रातील दुर्लक्ष या व अशा अनेक कारणांनी सातत्याने टीका झाल्यानंतर पृथ्वी शॉ याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून कान टोचून घेतले. खरेतर स्वतः सचिननेच यासाठी पुढाकार घेतला व एक अफलातून क्रिकेटपटू आपली गुणवत्ता वाया घालवत आहे हे लक्षात आल्याने सचिनने पृथ्वीचा क्लास घेतला.
मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खूप लहान वयातच प्रसिद्ध झालेल्या पृथ्वीकडे इंडिया मटेरियल म्हणूनच पाहिले जात होते. जस जसा तो मोठ्या स्तरावर खेळू लागला तसे त्याचे वर्तन काहींना खटकू लागले. एका स्पर्धेत घोट्याला दुखापत झाल्यानंतर वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी कोणाशीही चर्चा न करणे पृथ्वीला चांगलेच भोवले. त्याने बंदी असलेले औषध घेतल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर मुंबई क्रिकेट संघटनेने 8 महिन्यांची बंदी घातली. त्यावेळी जागतिक व राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने केलेल्या चाचणीत पृथ्वी दोषी आढळला होता. त्याच्यावर बंदी लावली गेली व त्याची मुदत संपल्यावर त्याने विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली व मुंबई ली या स्पर्धांमध्ये पुनरागमन करत दमदार कामगिरी केली. त्यानंतर त्याने रणजी स्पर्धेतही आपले सातत्य सिद्ध केले. मात्र, तरीही त्याच्या मैदानावरील व बाहेरील वर्तनावर सातत्याने ताशेरे ओढले जात होते. हे चित्र पाहिल्यानंतर खुद्द सचिननेच त्याचा क्लास घेण्याचे ठरवले.
पृथ्वी केवळ वीस वर्षांचा आहे. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. केवळ माहिती नाही म्हणून कोणालाही न विचारता औषध घेणे त्याने टाळायला हवे होते. त्याच्याशी खूप वेळा चर्चा केली व त्याला मैदानाबाहेर व मैदानावर वर्तणूक कशी पाहिजे याबाबत सल्ला दिला, मार्गदर्शनही केले. येत्या काळात तो अशी चूक करणार नाही असा मला विश्वास आहे. योग्य वयात जर योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळाले तर आपल्या चुका दुरुस्त करण्यात यशस्वी होता येते. हेच मी त्याला सांगितले व पुढील काळात अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा कारकीर्दीवर लक्ष केंद्रित कर असेही त्याला सांगितले, अशी माहिती सचिनने सांगितली.