जयपूर – राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरत असताना राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज पायलट यांच्यावर एका मुलाखतीत आतापर्यंतचा सगळ्यांत कठोर प्रहार केला. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, सचिन पायलट यांनी पक्षाला धोका दिला आहे. ते गद्दार आहेत व हायकमांड गद्दार व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री करू शकत नाही.
पायलट गटाच्या सक्रियतेवरून गेहलोत यांचा संयम आता सुटला असल्याचेच त्यांच्या या मुलाखतीतून प्रतीत झाले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यासोबत ते गुजरातमध्ये प्रचाराला आले असतानाच त्यांनी ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी तब्बल सहा वेळा पायलट यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला. ज्या व्यक्तीने पक्षाला धोका दिला, ज्याच्याकडे 10 आमदारांचाही पाठिंबा नाही त्याला मुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही.
पायलट यांनी 2020 मध्ये केलेल्या बंडाचा उल्लेख करताना ते म्हणाले की एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याचे ते भारतातले पहिले उदाहरण असावे. त्यांच्या या बंडाला भारतीय जनता पार्टीने फंड दिले होते असा दावाही त्यांनी केला. मात्र त्याचा पुरावा काही त्यांनी दिला नाही. त्यांनी थेट अमित शहा आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांची नावेही घेतली.
पायलट दिल्लीत अमित शहा आणि धर्मेंद प्रधान यांना भेटले होते. त्यांची चर्चाही झाली होती. त्यानंतर पायलट यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना कोणाला 5 कोटी तर कोणाला 10 कोटी रूपये मिळाले. ही रक्कम भाजपच्या कार्यालयातूनच घेतली गेली होती असा आरोप त्यांनी केला. मात्र त्याचाही कोणता पुरावा त्यांनी दिलेला नाही.