इशांत शर्माचे ‘डोके’ फिरले
नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेले अनेक विक्रम आता कर्णधार विराट कोहलीच्या नजरेत आहेत. तोच सचिनची कामगिरी मागे टाकू शकतो, असेही वर्तविले जात आहे. मात्र, सचिनपेक्षा विराट श्रेष्ठ असल्याचे सांगत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे. इशांतचे डोके फिरले आहे, त्यामुळेच तो सचिनपेक्षा विराटला श्रेष्ठ म्हणत आहे, असे सांगत नेटकऱ्यांनी इशांतचा चांगलेच फैलावर घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनचे विक्रम कोण मागे टाकणार असा प्रश्न इशांतला एका माध्यम प्रतिनिधीने विचारला होता, त्यावर मला तरी विराटच श्रेष्ठ वाटतो असे उत्तर इशांतने दिले होते. जेव्हा सचिन खेळत होता, तेव्हा सर डॉन ब्रॅडमन आणि सचिनमध्ये अशी तुलना केली जात होती, आता सचिन व विराटमध्ये ही तुलना केली जात आहे.
खरेतर हे खेळाडू समकालिन नाहीत, त्यामुळे त्यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असे अनेक आजी माजी केळाडूंनी यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, आपला टीआरपी वाढविण्यासाठी अनेक वाहिन्या सध्या मसालेदार बातम्यांसाठी विनाकारण कोणत्याही गोष्टीवर चर्चा घडवून आणताना दिसतात.
तसे पाहायला गेले तर खुद्द एकदा विराटनेच सचिनशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. सचिन खूप महान आहे, त्याच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही, त्याचे विक्रम व कामगिरी एकवेळ मागे टाकली जाईल मात्र, भारतातच नव्हे तर जगभरात त्याने क्रिकेटला तळागाळापर्यंत नेले तसेच ज्या श्रद्धेने त्याने खेळ केला त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही असे त्यावेळी एका मुलाखतीत विराटने सांगितले होते. मात्र, आता इशांतने या चर्चेत सहभागी होत विनाकारण स्वत:ला ट्रोल करून घेतले आहे.