#RaodSafteyWorldSeries : सचिन-सेहवागने पारणे फेडले

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रोडसेफ्टी टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सचिन 30 धावांची खेळी करुन बाद झाला मात्र, सेहवागने चौफेर फटकेबाजी केली व मैदान दणाणून सोडले.सचिनच्या घरच्याच म्हणजे वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंडियन लेजंडने वेस्ट इंडिज लेजंडचा 7 गडी राखून पराभव केला.

नाणेफेक जिंकत इंडियन लेजंडचा कर्णधार असलेल्या सचिनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जहीर खानने सचिनचा विश्‍वास सार्थ ठरवत वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज डॅरेन गंगाचा त्रिफळा उडवत स्वप्नवत सुरुवात केली. महान फलंदाज व वेस्ट इंडिज लेजंडचा कर्णधार ब्रायन लारा याला इरफान पठाणने यष्टीरक्षक समीर दिघेकडून यष्टीचीत बाद केले.

दुसऱ्या बाजूने नेहमीप्रमाणे फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावा केल्या. भारताकडून जहीर खान, मुनाफ पटेल व प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर, इरफान पठाणने 1 बळी घेतला. वेस्ट इंडिज लेजंड संघाने 20 षटकांत 8 बाद 150 धावा उभारल्या.

इंडियन लेजंड संघाच्या सचिन व सेहवाग जोडीने आक्रमक सुरुवात केली. या जोडीने भूतकाळातील आठवणी ताज्या करत 83 धावांची सलामी दिली. रंगात आलेल्या सचिनची खेळी अर्धवट संपविताना सुलेमान बेनने त्याला 36 धावांवर बाद केले, यावेळी चाहत्यांचा हिरमोड झाला. सचिननंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या महंमद कैफ व मनप्रीत गोनीने
निराशा केली.

सेहवागने मात्र आपण अजूनही मॅडमॅक्‍सच असल्याचे सिद्ध करत 57 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावांची आक्रमक खेळी केली. युवराजसिंगला साथिला घेत सेहवागने इंडियन लेजंड संघाचा 18.2 षटकांत 3 बाद 151 धावा करत विजय साकार केला. अखेरीस सेहवागने युवराज सिंहच्या साथीने दिलेलं आव्हान पूर्ण करत भारताने 7 गडी राखून सामन्यात बाजी मारली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.