मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ लोकशाही या वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करतात. मात्र यावेळी त्यांची कथित व्हिडिओ क्लीप समोर आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. यावर राजकीय नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले की, “हा अत्यंत आक्षेपार्ह प्रकार आहे. लोकशाही या वृत्तवाहिनीने ही बाब समोर आणलेल्यानंतर स्वत: किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मी अपेक्षा करतो की त्या मागणीनुसार याची चौकशी करावी. प्रत्येकाची प्रायव्हसी असते. कोणी कसे वागावे हा ज्याचा त्याचा भाग आहे. यावर जर आंदोलन होणार असेल तर आम्ही त्याला रोखण्याच काम करणार नाही.”
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही अशा आरोपांच्या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी.’