साडेआठ लाखांच्या साड्यांसह वाहन जप्त

कराड – सुर्ली घाट (ता. कराड) येथील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना मंगळवारी पहाटे एका वाहनात साडे आठ लाख रूपये किंमतीच्या साड्यांचे 13 गठ्ठे आढळून आले. ते गठ्ठे आणि वाहन, असा मिळून 13 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थिर पथकाने जप्त करून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

सुर्ली घाटातील चेकपोस्टवर मंगळवारी वाहनांची तपासणी सुरू होती. पहाटे दीडच्या सुमारास अशोक लेलॅंड कंपनीच्या वाहनात (क्र. एम. एच. 10 सी. आर. 1646) साडे आठ लाख रुपये किमतीचे साड्यांचे 13 गठ्ठे स्थिर पथकाला आढळून आले. विजय आण्णासो जाधव (रा. पळशी, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्याकडे सापडलेल्या या मालाबाबत त्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे दोन पंचांसमक्ष तो माल आणि वाहन जप्त करून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिला. मालाबाबात चोवीस तासात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च कक्षाकडे योग्य खुलासा करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.