अजय शिंदे
पुणे विभागातून सातारा, कराड, वाई आगारांची निवड
सातारा – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) रस्त्यांवरून धावणाऱ्या बसेसच्या लोकेशनचा तपशील नोंदवण्यासाठी या बसेसमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीमच्या (जीपीएस) धर्तीवर “व्हीटीएस’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) सॉफ्टवेअर बसवण्याची योजना अंमलात आणली जात आहे. या सिस्टीममुळे बसचे नेमके लोकेशन समजल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आजपर्यंत प्रवाशांना संबंधित स्थानकावर बस येण्याची अचूक वेळ कळत नव्हते. त्यामुळे एक तर त्यांना ताटकळत बसावे लागायचे किंवा बस वेळेच्या आधीच येऊन निघून गेल्याचे समजायचे; परंतु आता व्हीटीएस सिस्टीममुळे प्रवाशांना बसचे प्रत्यक्ष लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे बसची येण्याची नक्की वेळ (रियल टाइम अराव्हल) समजणार आहे. बऱ्याचदा एस.टी. बसचालक काही थांब्यांवर गाड्या थांबवत नाहीत तर जेवण, नाश्त्यासाठी गाड्या कोणत्याही हॉटेल, ढाब्यांवर विनाकारण जास्त वेळ थांबवत.
त्यामुळे प्रवाशांना सोसावा लागणारा त्रासही या सिस्टीममुळे थांबणार आहे. निश्चित केलेल्या वेळेत बस पोहोचवण्यासाठी चालकांकडून काही अनिवार्य बस थांबे चुकवले जातात. त्यामुळे तेथील प्रवाशांनाही मन:स्ताप होतो. आता तसे झाल्यास व्हीटीएस प्रणालीमुळे बसची माहिती नियंत्रण कक्षात दिसणार आहे. त्यामुळे दोषी चालकावर त्वरित पुढील कारवाई करणे सोप्पे होणार आहे.
अपघात झाल्यावरही त्याची माहिती तत्काळ मिळेल आणि मदत पोहोचवणेही या सिस्टीममुळे सुलभ होणार आहे. “व्हीटीएस’ डिव्हाइसची लिंक पोर्टलला जोडली गेली आहे. त्यामुळे या बसगाड्या सिस्टीमध्ये ट्रॅक होणार आहेत. शिवाय बसमध्ये चालक, वाहक कोण आहेत, त्यांचे मोबाइल नंबर यांचा तपशील या पोर्टलला असणार आहे. या सिस्टीमचे मोबाईल ऍपही लवकरच सुरू होणार आहे.
यासाठी प्रायोगिक तत्वावर पुणे विभागातून सातारा, वाई, कराड या तीन आगारांची निवड झाली असून या आगारांमधील लांब पल्ल्याच्या नऊ मार्गांवरील बसगाड्यांमध्ये “व्हीटीएस’ डिव्हाइस बसवले जाणार आहे.
सातारा आगारातील 112, कराड आगारातील 105 आणि वाई आगारातील 65 बसेसमध्ये “व्हीटीएस’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) डिव्हाईस बसवले आहेत.
यापूर्वी काही शिवनेरी बसमध्ये “जीपीएस’ बसवून वाय-फाय कनेक्टिव्हीटी सुरू केली आहे. निमआराम बसेसमध्येही आता “व्हीटीएस’ बसविण्यात येणार आहे. हे सॉफ्टवेअर एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसमध्ये चढलेल्या किंवा बसमधून उतरलेल्या प्रवाशांची संख्यादेखील नोंदवणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच बसेसमध्ये ही सिस्टीम टप्प्याटप्प्याने बसवण्यात येणार आहे. सर्व विभागीय प्रमुखांना संगणक वापरण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते आणि आता त्यांना डेटा कार्डसह लॅपटॉप देण्यात आले आहेत. हे लॅपटॉप आणि डेटा कार्ड जीपीएस बसविलेल्या राज्यातील प्रत्येक बसचा मागोवा घेण्यास अधिकाऱ्यांना उपयुक्त ठरतील. बसने केलेल्या प्रवासाचा मार्ग “जीपीएस’ कव्हर करेल आणि प्रत्येक प्रवासातील अन्य महत्त्वाची माहितीही साठवून ठेवणार आहे.
सध्या सातारा, वाई, कराड या तीन आगारांमधील 270 बसेसमध्ये डिव्हाइस इंस्टॉल केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राथमिकता दिली जाणार असून जिल्ह्यातील प्रत्येक बसमध्ये ही सिस्टीम टप्प्याटप्प्याने बसवणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका क्लिकवर बसेस ट्रॅक होणार असून त्या बसेसची सर्व माहितीही मिळणार आहे.
– प्रशांत काळे, वाहतुक निरीक्षक