मद्रिद : स्पेन आणि युरोपीय संघाबरोबर भारताचे असलेले संबंध अशांततेच्या काळात स्थिरता निर्माण करण्यासाठी उपयोगी असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर दोन दिवसांच्या भेटीसाठी आज स्पेनला रवाना झाले. त्या दरम्यान एक्स या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.
अडीच महिन्यांपुर्वी स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सँचेझ भारतभेटीवर आले होते. त्यानंतर जयशंकर स्पेन भेटीवर गेले आहेत. या स्पेन भेटीदरम्यान जयशंकर स्पेनबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून जयशंकर यांचा हा स्पेनचा पहिलाच दौरा आहे. स्पेन भेटीच्या पहिल्या दिवशी जयशंकर यांनी राजधानी मद्रिदमध्ये राजदूतांच्या ९ व्या वार्षिक परिषदेला संबोधित केले.
आपल्या स्वतःच्या ओळखीसह परराष्ट्र धोरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. राष्ट्रे त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि वारशातून त्यांच्या विशिष्ट राजनैतिकतेचा मार्ग कसा अवलंबतात याबद्दल जयशंकर यांनी आपली मते या परिषदेत व्यक्त केली. ज्यांना अनेक ओळखी आहेत ते अस्थिर आणि अनिश्चित काळात अधिक यशस्वीरित्या मार्ग काढतील. या अशांत काळात भारताचे स्पेन आणि युरोपीय संघाशी असलेले संबंध स्थिरीकरणाचा घटक ठरू शकतो, यावरही त्यांनी भर दिला.