पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत सेंच्युरी क्रिकेट क्लब संघाने स्पायडर स्पोर्टस संघाचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ओंकार खाटपे याने फटकावलेल्या 70 धावांच्या जोरावर सेंच्युरी क्रिकेट क्लबने स्पायडर स्पोर्टसचा 87 धावांनी पराभव केला व उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना सेंच्युरी संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 156 धावा केल्या. ओंकार खाटपे याने 44 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारांसह 70 धावा फटकावल्या. ओंकारला अनिकेत पोरवाल (23 धावा) व हर्ष आर. (35) यांनी साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना स्पायडर्स स्पोर्टस संघाचा डाव 15 षटकात व 69 धावांवर आटोपला. सेंच्युरी संघाचा अक्षय दरेकर याने 6 धावांत 4 गडी तर, निलय नेवासकर 12 धावांत 3 गडी बाद करून संघाला झटपट विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात अनिश गायकवाड याच्या खेळीच्या जोरावर स्पायडर स्पोर्टस संघाने ईगल्स् क्रिकेट क्लबचा 49 धावांनी पराभव केला. स्पायडर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना अनिश गायकवाड (77 धावा) आणि अजय भोसले (26 धावा) यांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 155 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना ईगल्स् क्रिकेट क्लबचा डाव 18.3 षटकांत व 106 धावांवर आटोपला. यामध्ये संदीप शिंदे याने 41 धावा करून एकाकी लढत दिली.
संक्षिप्त धावफलक –
1) सेंच्युरी क्रिकेट क्लब ः 20 षटकांत 8 बाद 156 धावा. (ओंकार खाटपे 70, अनिकेत पोरवाल 23, हर्ष आर. 35, जयदीप जाधव 3-23, अजय भोसले 2-17) वि. वि. स्पायडर्स स्पोर्टस ः 15 षटकांत सर्वबाद 69 धावा. (आनंद शहा 18, अजय भोसले 16, अक्षय दरेकर 4-6, निलय नेवासकर 3-12). सामनावीर ः ओंकार खाटपे.
2) स्पायडर स्पोर्टस ः 20 षटकांत 5 बाद 155 धावा. (अनिश गायकवाड 77, अजय भोसले 26, मयुरेश लिखिते 2-13, रोमेश यदावते 2-28) वि. वि. ईगल्स् क्रिकेट क्लब ः 18.3 षटकांत सर्वबाद 106 धावा. (संदीप शिंदे 41, मयुरेश लिखिते 16, आनंद शहा 2-24). सामनावीर ः अनिश गायकवाड.