किव्ह – युक्रेनच्या औद्योगिक क्षे6ावर पूर्ण ताबा मिळवण्याच्या हेतूने रशियाकडून पूर्वेकडील डोनबास भागावर अजूनही हल्ले केले जात आहेत. मात्र युक्रेनच्या फौजांनी कडवट प्रतिकार सुरूच ठेवल्यामुळे रशियाच्या हल्ल्याची धार क्षीण झाली आहे. युक्रेन आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे.डोनबासमधील डोनेत्सक आणि लुहान्सक बागांवर पूर्ण ताबा मिळवण्याच्या हेतूने रशियाकडून हल्ले सुरू आहेत. या भागांपासून क्रिमियाला जोडणाऱ्या मार्गावर रशियाला ताबा हवा आहे. त्यातच मारिऊपोलला जोडणाऱ्या सागरी मार्गाचाही भाग येत आहे. त्यामुळे या भागावरील ताब्यासाठी रशियाकडून अधिक जोर लावला जात आहे. तर युक्रेनचे सैन्य आपल्या बचावासाठी निकराचा प्रतिकार करत आहे.
युक्रेनच्या फौजांनी गेल्या 24 तासात रशियाचे 8 हल्ले परतवून लावले आहेत. यामध्ये रशियाचे 9 रणगाडे, 18 सशस्त्र युनिट आणि 13 चिलखती वाहनांसह 3 तोफखानेही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे रशियाकडून युक्रेनच्या लष्करी तळांवर तसेच नागरी वसाहतींवरदेखील क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा मारा सुरूच ठेवला गेला आहे, असे युक्रेनच्या जनरल स्टाफने फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रशियाने पोपास्ना शहरावर केलेल्या माऱ्यामध्ये दोन नागरिक ठार झाल्याचे लुहान्सकचे गव्हर्नर सार्ही हैदेई यांनी म्हटले आहे. डोनेस्क आणि लुहान्सकमधील नागिरकांना सोडवण्यासाठी पोक्रोव्हस्क शहरातून एक रेल्वे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मारिऊपोल शहरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सोडवण्याचे पूर्वीचे बहुतेक प्रयत्न अपयशी ठरले असले तरी युक्रेनकडून पुन्हा या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले गेले असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जोरदार हल्ले करूनही रशियाच्या सैन्याला गेल्या 24 तासात मोठे यश मिळालेले नाही, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.