Russian President Vladimir Putin – रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांचे सायबेरियाच्या अल्ताई पर्वतरांगेतील आलिशान घर जळून खाक झाले आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याचे गुढ मात्र उकलले नाही. तथापि, या घटनेमागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला जातो आहे.
अल्ताई राज्यातील ओंगुडेस्की जिल्ह्यात पुतीन यांचा आलिशान महाल उभारण्यात आला होता. सायबेरियातील हा भाग मंगोलिया, चीन आणि कझाकिस्तानच्या सीमेलगतचा भाग आहे.
एका ब्लॉगरने या घराला लागलेल्या आगीची बातमी आणि काही छायाचित्रे उघड केली आहेत. त्यानंतर तेथील एका माध्यमाकडून याची खातरजमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुतीन यांच्या कार्यालयाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
ज्या भागात पुतीन यांचा महाल उभा करण्यात आला आहे त्या भागात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशाला मनाई आहे. मात्र माध्यमांमधून त्यासंदर्भात अनेक बातम्या येत असतात.
अशाच बातम्यांत करण्यात आलेल्या दाव्यांनुसार या महालाजवळ एक फार्म आहे व तेथे हरिण पाळले जातात. त्यांच्या शिंगांच्या रक्ताने पुतीन अंघोळ करतात. तसे केल्यामुळे कोणत्या व्याधी होत नाहीत आणि क्षमता वाढते असेही म्हटले गेलेआहे.
या घराजवळच एक बंकर आहे व तेथे किमान एक लाख लोक राहु शकतात. त्याची निर्मिती जेंव्हा करण्यात आली होती तेंव्हा जर्मनीतून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते व त्यांनी आपल्यासोबत मोठी यंत्रसामुग्री आणली होती असेही दावे केले जातात.