मॉस्को – रशियाच्या पाठिंब्यावरील एका अधिकारयाची युक्रेनच्या खेरसोन प्रांतात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रशियाच्या पाठिंब्यावरील स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. विटली गुरा असे हत्या झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते काखोवका जिल्ह्याचे उपप्रमुख होते. गोळीबारात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे अन्य एका स्थानिक अधिकाऱ्याने टेलिग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. रहात्या घरीच गुरा यांच्यावर हा गोळीबार झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.
काखोवका जिल्हा खेरसोन शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. युक्रेनच्या ताब्यातील या भागावर आता रशियाचा ताबा आहे. या भागातील रशियाचे समर्थन असलेल्या अधिकाऱ्यांवर गेल्या काही आठवड्यांमध्ये जीवघेणे हल्ले झाले आहेत. खेरसोन आणि झापोरझझियाच्या आजूबाजूच्या भागांवर आता रशियाने ताबा मिळवला आहे. या भागांमध्ये रशियाने आपल्या “रुबल’ चलनाचा वापर आणि रशियाच्या पासपोर्टचे वाटप करायला सुरुवात केली आहे.
युक्रेनच्या सैनिकांनी कडवा प्रतिकार करत खेरसोन भागातील काही भूभागावर पुन्हा आपला ताबा मिळवायलाही सुरुवात केली आहे. मात्र रशियाच्या सैनिकांच्या प्रत्युत्तरांमुळे युक्रेनच्या सैनिकांना अजून खेरसोन शहरात प्रवेश करता आलेला नाही.