अंकारा – रशियाचे एक मालवाहू जहाज तुर्की जवळ काळ्या समुद्रामध्ये बुडाले, अशी माहिती स्थानिक गव्हर्नरने सरकारी वृत्तवाहिनीला आज दिली. या जहाजावर 15 कर्मचारी होते. हे सर्वजण समुद्रामध्ये अडकून पडले असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे बार्टिन प्रांताचे गव्हर्नर सिनान गुनेर यांनी सांगितले.
तुर्कीच्या बार्टिन प्रांताजवळ इनकूमू भागातील किनारपट्टीजवळ हे मालवाहू जहाज बुडाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हे जहाज बुडण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तुर्कीने 3 लाईफ बोट पाठवून 15 कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काळ्या समुद्रातील सध्याचे वातावरण खराब असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत, असेही गव्हर्नर गुनेर यांनी सांगितले. अद्याप समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही.
या परिसरातील प्रवासी जहाजांनाही मदत कार्याला सहकार्य करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तुर्कीच्या नौदलाच्या नौकांही घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात येणार आहे.