किव्ह – युक्रेनची राजदानी किव्हवर रशियाने आज पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे. राजधानी किव्हमधील दोन प्रशासकीय इमारतींवर हा ड्रोन हल्ला झाला. या भागात युक्रेनच्या प्रशासनाची अनेक कार्यालये आहेत. आज झालेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये किमान दोघेजण ठार झाले आहेत. मोठे स्फोट झाल्याच्या आवाजांनी हा भाग चांगलाच हादरला. ही ड्रोन यापूर्वी झालेल्या ड्रोन हल्ल्यांप्रमाणेच इराणी बनावटीची होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेवचेन्सकीवस्की जिल्ह्यात एका ड्रोनमुळे दोन इमारतींचे नुकसान झाले. तर शहराच्या दक्षिणेकडील एका घराचेही ड्रोन हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. त्याच सुमारास युक्रेनच्या लष्कराने राजधानी किव्हवर घोंघावणारी 10 सशस्त्र ड्रोन पाडल्याचा दावा देखील केला आहे. ही ड्रोन अजोव समुद्राच्या पूर्व किनाऱ्याजवळून सोडण्यात आली होती. यापूर्वी 5 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला झाला होता. तेंव्हा युक्रेनने 60 ते 70 ड्रोन पाडली होती.