पुणे – पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर हे आंतरराष्ट्रीय स्थितीवरून ठरतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन दर वाढले आहेत, ते कमी झाले नाहीत. युद्ध थांबल्यानंतर इंधन दरावरील परिणाम दिसून येतील, असा दावा माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी केला.
युरोप आणि लॅटिन अमेरिकेच्या तुलनेत भारतात महागाई दर कमी आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था इंग्लडला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, असेही जावडेकर म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील “एनडीए’ सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली.
या काळातील सरकारच्या निर्णयांची माहिती शहर भाजप कार्यालयात जावडेकर यांनी दिली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. येत्या लोकसभा निवडणुकीत 350 पेक्षा जास्त जागा भाजप आणि एनडीए ला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा आमचा ठाम विश्वास आहे, असा दावा जावडेकर यांनी केला.