किव्ह – युक्रेनला ब्रिटनकडून रणगाडे आणि दारुगोळ्याची मदत केली जाईल, अशी ग्वाही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली आहे. दरम्यान रशियाने आपल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रमाण वाढवले असून युक्रेनची राजधानी किव्ह आणि अन्य महत्वाच्या शहरांवर थेट क्षेपणास्त्र हल्ला केला जाऊ लागला आहे.
रशियाने हे क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभुमीवर ऋषी सुनक यांच्या कार्यालयाने निवेदन प्रसिद्धीस देऊन युक्रेनला नव्याने लष्करी सामुग्रीची मदत जाहीर केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर युक्रेनला चॅलेंजर 2 रणगाडे आणि दारुगोळा दिला जाईल, असे सुनक म्हणाले.
युक्रेनला किती रणगाडे दिले जातील आणि ते कधीपर्यंत दिले जातील, याचा कोणताही तपशील सुनक यांनी जाहीर केला नाही. मात्र युक्रेनला ब्रिटीश लष्करातील 4 चॅलेंजर 2 श्रेणीतील रणगाडे त्वरित दिले जातील. त्यानंतर आणखीन थोड्या कालावधीने आणखीन 8 रणगाडे पाठवून दिले जातील, असे ब्रिटीश लष्कराच्यावतीने म्हटले आहे. मात्र या वृत्तामध्ये लष्कराच्या सूत्रांचा हवाला देण्यात आलेला नाही.
दुसरीकडे रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्रांचा हल्ला अधिक तीव्र केला आहे. या क्षेपणास्6ांच्या माऱ्यामध्ये युक्रेनमधील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असेल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. निपर नदीच्या खोऱ्यातील निप्रोव्हत्सकी जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत, असे किव्हच्या महापौरांनी म्हटले आहे. या क्षेपणास्त्रांमुळे नदीच्या उजव्या बाजूच्या इमारतींना आग लागल्याचेही महापौरांनी म्हटले आहे. मात्र या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
किव्ह शहरातील कोणत्या भागाला लक्ष्य केले गेले आणि त्यात किती नुकसान झाले, याचा तपशील मिळू शकलेला नाही. 2023 वर्षाला सुरुवात झाल्यापासून युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने कोणत्याही प्रकारचा हल्ला केलेला नव्हता. मात्र राजधानीजवळच्या काही गावांमधील 18 घरांचे नुकसान झाल्याचे समजते आहे. खारकिव्ह शहरावरही रशियाने क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलेदार शहर जिंकल्याचा दावा रशियाच्या सैन्याकडून केला गेला असला तरी या शहरामध्ये युक्रेनचे सैन्य अजूनही लढत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.