किव्ह – रशियाने युक्रेनवर हल्ल्याला 100 दिवस पूर्ण झाले. मात्र या युद्धातून कोणीही विजयी झाले नसल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्राच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने केले आहे. त्यातच रशियाचे सैन्य आता अतिपूर्वेकडील डोनबास प्रांतात खोलवर घुसले आहे.
“या युद्धात कोणीही विजयी झालेले नाही आणि कोणीही विजयी होणारही नाही. मात्र, आपण काय गमावले आहे, हे आपण गेल्या 100 दिवसांत अनुभवले आहे.’ असे संयुक्त राष्ट्राचे सहायक सरचिटणीस आणि संयुक्त राष्ट्राचे युक्रेनसाठीचे आपत्ती समन्वयक आमिन आवाड यांनी म्हटले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी कालच रशियाच्या ताब्यात युक्रेनच्या भूमीचा 20 टक्के भाग असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अवाड यांचे हे महत्त्वाचे वक्तव्य आले आहे.
रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. सुरुवातीला युक्रेनची राजधानी किव्ह आणि ईशान्येकडील खारकिव्ह शहरावर रशियाच्या सैन्याने हल्ले केले होते. नंतर रशियाने आपला मोर्चे मारिऊपोल आणि डोनबास प्रांताकडे वळवला. युक्रेनच्या दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे रशियाने हळूहळू एक एक शहरे पादाक्रांत केली आहेत. मात्र, या युद्धामुळे नागरिकांची अपरिमित हानी झाली आहे. सर्वसामान्य जीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे, असे आवाड म्हणाले.
युक्रेनमध्ये मदत साहित्य पोचवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची यंत्रणा कार्यरत आहे. तेथे अन्नधान्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असेही अवाड म्हणाले.