रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: पाच भारतीयांची एकेरीत आगेकूच

सौरभ, ऋतुपर्णा उपान्त्यपूर्व फेरीत

व्लाडिव्होस्टॉक: भारताचा अव्वल पुरुष खेळाडू सौरभ वर्मा आणि राष्ट्रीय विजेती ऋतुपर्णा दास यांच्यासह पाचवा मानांकित शुभंकर डे, मिथुन मंजुनाथ यांनी पुरुष एकेरीत, तसेच वृषाली गुम्माडीने महिला एकेरीत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारताना येथे सुरू झालेल्या रशिया ओपन टूर सुपर-100 बॅडमिंटन स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. परंतु सिद्धार्थ प्रताप सिंग आणि सातवी मानांकित मुग्धा आग्रे यांचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी भारताच्या राहुल यादवला नमविणाऱ्या आठव्या मानांकित सौरभ वर्माने रशियाच्या सर्गेई सिरॅंटचा 21-11, 21-9 असा केवळ 26 मिनिटांत पराभव करून उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. तर आधीच्या फेरीत बेल्जियमच्या इलियास ब्रॅकेवर मात करणाऱ्या मिथुन मंजुनाथने जपानच्या कोजी नाइटोचा 21-16, 21-13 असा 33 मिनिटांत फडशा पाडताना उपान्त्यपूर्व फेरीतील स्थान निश्‍चित केले. पाचव्या मानांकित शुभंकर डे याने सिद्धार्थ प्रताप सिंगचे आव्हान 21-11, 21-19 असे 31 मिनिटांत संपुष्टात आणताना आगेकूच केली.

महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीत रशियाच्या व्हिक्‍टोरिया स्लोबोदिन्युकला नमविणाऱ्या भारताच्या ऋतुपर्णा दासने मलेशियाच्या द्वितीय मानांकित यिंग यिंग ली हिच्यावर 13-21, 21-17, 21-19 असा 53 मिनिटांच्या कडव्या झुंजीनंतर पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरी गाटली. ऋतुपर्णाने पहिली गेम गमावल्यावरही झुंजार पुनरागमन करताना पुढच्या दोन्ही गेम जिंकत बाजी मारली. महिला एकेरीतील अन्य सामन्यात वृषाली गुम्माडीने कोरियाच्या लिम ली हिच्यावर 21-11, 21-13 अशी केवळ 24 मिनिटांत मात करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. मात्र सातव्या मानांकित मुग्धा आग्रेला अमेरिकेच्या इरिस वॅंगविरुद्ध 4-21, 13-21 असा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.

स्पेनच्या अग्रमानांकित पाब्लो ऍबियनने चिराग सेनचा, जपानच्या रयोतारा मारुओने पारुपल्ली कश्‍यपचा, तर इस्रायलच्या तृतीय मानांकित मिशा झिबरमनने प्रतुल जोशीचा पराभव केला. व्हाईट नाईट्‌स स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणारा गुणवान खेळाडू अजय जयरामसह गुरुसाई दत्त, पारुपल्ली कश्‍यप, प्रतुल जोशी, चिराग सेन, राहुल यादव, बोधित जोशी, वैदेही चौधरी व साई उत्तेजिता राव या भारतीय खेळाडूंचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले आहे.

दुहेरीतही भारतीयांची आगेकूच

पुरुष दुहेरीत भारताच्या अरुण जॉर्ज व सन्यम शुक्‍ला या जोडीने जेफ्री लॅम व हिन शुन वोंग या जोडीचा21-12, 21-13 असा पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली. तर मिश्र दुहेरीत रोहन कपूर व कुहू गर्ग या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने अलेक्‍सी पॅनोव्ह व पोलिना मॅकोव्हीव्हा या रशियन जोडीवर 21-10, 21-14 अशी 24 मिनिटांत मात करताना उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या तृतीय मानांकित भारतीय जोडीनेही आर्टेण सेर्पियोनोव्ह व ऍनेस्तेशिया पुतिनस्काया या रशियन जोडीचा 21-6, 21-12 असा केवळ 22 मिनिटांत पराभव करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)