नवी दिल्ली – भारत सरकारने मेक इन इंडिया मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर भारत सरकारने किमती स्थिर ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षात केलेले प्रयत्न प्रशंसनिय आहेत असे पुतिन यांचे म्हणणे आहे. भारताच्या या धोरणाला पाठिंबा देत भारत रशियन कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्रे सुरू करावीत यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत असे पुतीन यांनी सांगितले.
मास्को येथे रशियन उद्योजक आणि गुंतवणूकदारांबरोबर चर्चा करताना पुतीन यांनी सांगितले की, भारत सरकारने परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडिया मोहीम हाती घेतली आहे. यामुळे भारतात मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन वाढत आहे. रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होत आहे. भारताच्या या मोहिमेला रशियातील उद्योजकांनी आणि गुंतवणूकदारांनी पाठिंबा द्यावा. भारतात उत्पादन केंद्र सुरू करावीत असे ते म्हणाले.
भारत सरकारने घेतलेल्या विविध पुढाकारामुळे भारतातील छोट्या उद्योगाची उत्पादकता वाढत आहे. ही बाब प्रशंसनिय आहे. कारण यामुळे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये रोजगार निर्मिती वाढत आहे. भारतात झालेली गुंतवणूक दीर्घ पल्ल्यात फायदेशीर होणार आहे. त्यामुळे रशियन उद्योगांनी आणि गुंतवणूकदारांनी भारतात प्रकल्प हाती घेण्याबाबत पुढाकार घ्यावा.
रशियातील खनिज तेल क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रोजनेफ्टने भारतात आगोदरच 20 अब्ज डॉलरची म्हणजे 1.60 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स सदस्य देशांनी परस्परांच्या देशातील लघु उद्योगांना मदत होण्यासाठी समन्वय साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ब्रिक्स देशांनी जागतिक व्यापारासाठी डॉलरचा वापर टाळला तर या देशाविरोधात 100% आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. यावर पुतीन यांनी वक्तव्य केले नाही.