…तर 1983 मध्ये तिसरे महायुध्द सुरू झाले असते!!!

अमेरिकेवर हल्ला करणार होती रशिया

मॉस्को – 26 सप्टेंबर 1983 रोजी तत्कालीन सोवियत संघाच्या अण्वस्त्र हल्लाविरोधी केंद्राच्या संगणक यंत्रणेवर एक अलर्ट आला होता. त्यात अमेरिकेची क्षेपणास्त्रे सावियत संघवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी लष्करी अधिकारी स्तानिस्लाव पेट्रोव ड्युटीवर होते. अमेरिकेने क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर ते प्रचंड तणावात आले होते. अशा प्रकारची काही घटना घडली तर कमांडर इन चीफला सर्वप्रथम त्याची माहिती दिली जावी असा नियम आहे. मात्र पेट्रोव यांनी त्यावेळी केलेली कृती जगाला तिसऱ्या महायुध्दाच्या आणि विनाशाच्या उंबरठ्यावरून परत मागे नेण्यास उपयुक्त ठरली.

पेट्रोव यांनी या माहितीवर विश्‍वास ठेवण्यास नकार दिला. आपल्या यंत्रणेत काहीतरी बिघाड झाला असून तो दुरूस्त करण्यात यावा अशी तक्रार त्यांनी त्यावेळी नोंदवली. त्यांची शंका खरी ठरली. कारण त्या दिवशी अमेरिकेने असा कोणताही क्षेपणास्त्र हल्ला केला नव्हता व हे तब्बल 27 वर्षांनंतर उघड झाले. मात्र या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने तेव्हाच आपली 108 अण्वस्त्रांनी सज्ज विमाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी सज्ज ठेवली होती. त्यावेळी जर युध्दाची ठिणगी पडली असती तर 1983 मध्ये तिसरे महायुध्द सुरू झाले असते व अवघे जग विनाशाच्या उंबरठ्यावर येउन ठेपले असते.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार ही बाब उघड झाली आहे. त्यावेळी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तिच्या मित्रराष्ट्रांचा युध्दसराव सुरू होता. एबल आर्चर नावाने सुरू असलेल्या या युध्दाभ्यासात अमेरिकेसोबत ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांच्यासह इतर काही शक्तीशाली राष्ट्रे सहभागी झाली होती. सोवियत रशियाच्या विरोधात वास्तविक युध्द झाले तर काय, या दृष्टीकोनातून हा अभ्यास केला जात होता. हल्ला झालाच तर प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाही तयारीत होता व त्याकरताच त्यांनी विमाने सज्ज ठेवली होती.

एका अधिकाऱ्याने चुकीने का होईना सूज्ञ निर्णय घेतल्यामुळे तेव्हा पुढील अनर्थ टळला. हे आता नंतर उघड झालेल्या दस्तावेजावरून स्पष्ट झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.