नवी दिल्ली: जागतिक उत्तेजक द्रव सेवन प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांची बंदी घातली असून यामुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे पुढील चार वर्षे रशियाला आपल्या ध्वजाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आणि विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतूनही रशिया बाहेर राहणार आहे. डोपिंगबाबत एका लॅबमधून चुकीचा तपशील देण्यात आल्याने त्याची गंभीर दखल घेत वाडाने रशियावर चार वर्षे बंदी घालण्याचे कठोर पाऊल उचलले आहे.
रशियावर चार वर्षे बंदी घालण्यात आली असली तरी ज्या रशियन खेळाडूंना क्लीन चिट मिळेल ते खेळाडू तटस्थ ध्वजाखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतील. वाडाने घेतलेल्या निर्णयास रशिया पुढील 21 दिवसांच्या आत आव्हान देऊ शकते.
रशियाने या निर्णयास आव्हान दिल्यास याबाबत आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होणार आहे. बंदीमुळे रशियाला 2032 च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक यजमानपदासाठीही अर्ज करत येणार नाही. 1999 साली वाडाची स्थापना झाली. दोषी खेळाडूंवर किमान 2 वर्षांच्या शिक्षेपासून तहहयात बंदी घालण्याचे अधिकार वाडाला आहेत.