शिरूरमधील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर

इमारत सुसज्ज; मात्र अत्याधुनिक यंत्रणेअभावी रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याची वेळ

शिरूर-शिरूर तालुक्‍यात ग्रामीण रुग्णालयाचांच्या इमारती सुसज्ज झाल्या; परंतु तेथे वापरण्यात येणाऱ्या अनेक साधन सामग्री आजही जुन्याच आहेत. अत्याधुनिक उपकरणांअभावी रुग्णांना अनेक तपासण्या बाहेरच कराव्या लागतात. या रुग्णालयात असणारे सोनोग्राफी मशीन अनेक दिवसापासून गायब आहे, तर एक्‍स-रे मशीन धूळखात पडून आहे.

शिरूर तालुक्‍यांत शिरूर शहर, शिक्रापूर, न्हावरे या मोठ्या गावांत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती झाल्या असून, या रूग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येतात. परंतु येथे असणारे एक्‍स रे मशीन, रक्त लघवी तपासणी यंत्र, जन्मलेले बाळ ठेवण्याचे अत्याधुनिक पेटी अशा विविध यंत्र सामग्रीबरोबर येथील फर्निचरही जुनेच आहे. रुग्णालय नवीन असले तरी आतील साहित्य जुन्याच प्रकारचे असल्याने अनेक तपासण्या रुग्णांना बाहेरून करून आणावयास लागत आहे. तपासण्या बाहेर करून आणणे खूप महागाचे आहे. त्यामुळे नागरिकांना ते परवडणारे नाही. यासाठी नवीन इमारत केलेल्या ग्रामीण रूग्णालयांना अत्याधुनिक सामग्री पुरवणे तातडीने गरजेचे आहे.

रुग्णांना कमी दरात उपचार व्हावेत यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सोयी सुविधा कमी पडता कामा नयेत. याची शासनाने दखल घेणे गरजेचे असून, अत्याधुनिक इमारत केलेल्या या रूग्णालयात अत्याधुनिक साधन सामुग्री आणणे आवश्‍यक आहे. या रूग्णालयात अनेक मोठ-मोठ्या आजांरावर मोफत उपचार केले जातात. महागडी औषध मोफत दिली जात आहेत. याची जनजागृती करणे गरजेचे आहे. या रूग्णालयात पूर्वी अनेक प्रकारचे उपचार, बाळंतपण केली जात होती; परंतु सध्या या ठिकाणी अत्याधुनिक साधन सामग्रीसह, गायनिक (स्त्री रोग तज्ञ) नसल्याने अनेक रुग्ण येऊनही त्यांच्यावर उपचार किंवा बाळंतपण करू शकत नसल्याची खंत येथील अधिकारी बोलून दाखवत आहेत.

इमारत नवीन असली तरी उपचार चांगले मिळाले नाहीत तर रुग्णही ग्रामीण रूग्णालयात फिरकणार नाहीत. परिणामी या इमारती धूळ खात पडतील हे नक्की खरे! याशिवाय या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्‍स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनदेखील केवळ तज्ज्ञ नसल्याने लाखो रुपयांच्या या मशीन धूळखात पडून आहेत.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने व सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिला जात आहे. या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून सिजरिंगची बाळंतपण सुरू केले आहे; परंतु याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नाही. हे सिजरिंग करताना शहरातील खासगी नामाकित तज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक शासनाने केली आहे.

  • आमदारांनी लक्ष घालावे
    नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी या ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देऊन या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बदलावी, अशी मागणी गोरगरीब नागरी सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला वर्गातून होत आहे. या रुग्णालयात असणारे सोनोग्राफी मशीन बंद असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे मशीन दुसरीकडे हलवल्याचे समजते. त्यामुळे येथील नागरिकांना उपचारासाठी दिलेले हेच सोनोग्राफी मशीन दुसऱ्या रुग्णालयात कसे काय हलवले, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)