शिक्रापुरात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागात मतभिन्नता : रुग्णांची खडतर सेवा
शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामीण रुग्णालय नागरिकांना वरदान ठरलेले आहे. शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून बांधलेल्या अद्ययावत ग्रामीण रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची वहिवाट बिकट झाली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीकडे रस्ता दुरूस्तीसाठी पाठपुरावा केल्याने आरोग्य केंद्रातील अधिकारी सांगत आहेत. तर हा रस्ता खासगी मालकीचा आहे. तो ग्रामपंचायतीकडे वर्ग नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. या प्रश्नांत रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
शिक्रापूर येथे खासगी रुग्णालयाला लाजवेल, असे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सणसवाडी, जातेगाव, पिंपळे जगताप आदी परिसरातील गावांमधून रुग्ण उपचारासाठी येतात. हे रुग्णालय मुख्य रस्त्यापासून दोनशे मीटर अंतरावर आहे. परंतु या ठिकाणी असलेला रस्ता उखडला आहे. रुग्णालयाच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडे व झुडपे देखील वाढली आहेत. त्यामुळे येथे सापांचा व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
रात्रीच्या वेळेस रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रवास करण्यासाठी रस्त्यावर विजेची देखील व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांना अंधारात चाचपडत जावे लागत आहे. अनेकांना ये जा करताना सापांचे दर्शन झालेले आहे. या रस्त्याने जाण्यासाठी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करून रस्त्याचे दुतर्फा विजेची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
- ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनास रस्ता दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली आहे. अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही.
– डॉ. वैजिनाथ काशीद, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर. - रस्ता ग्रामपंचायतीकडे वर्ग नाही
शिक्रापूर येथील ग्रामीण रूग्णालयासाठी वापरण्यात येणारा रस्ता खासगी मालकीचा आहे. हा रस्ता ग्रामपंचायतीकडे वर्ग नाही. त्यामुळे रस्ता बनविण्यासाठी अडचण येत आहे.
– गुलाब नवले, ग्रामविकास अधिकारी, शिक्रापूर.