नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात देशात ट्रॅक्टरचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्याचबरोबर याच महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीतही चांगलीच वाढ झालेली आहे. ट्रॅक्टरच्या मागणीत सुधारणा झाल्याने तसेच आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपन्यांनी उत्पादन वाढवल्याने सप्टेंबर महिन्यात देशात विविध कंपन्यांमध्ये मिळून एकूण 99,523 ट्रॅक्टरचे उत्पादन झाले. यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये 92,422 ट्रॅक्टरचे उत्पादन झाले होते.
सप्टेंबर 2020 मध्ये देशभरात 1,08,585 ट्रॅक्टरची विक्री झाली. सप्टेंबर 2019 चा विचार करता विक्रीत 28 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सप्टेंबर 2019 मध्ये 84,726 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. मात्र सर्वाधिक ट्रॅक्टर विक्रीचा ऑक्टोबर 2018 मधील विक्रम कायम आहे. त्यावेळी 1,12,556 ट्रॅक्टरची एका महिन्यात विक्री झाली होती.
ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनकडील माहितीनुसार 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या सहा महिन्यांमध्ये 4,02,607 ट्रॅक्टरची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच कालवधीतील विक्रीच्या तुलनेत तब्बल 13 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 3,57,652 ट्रॅक्टरची विक्री झाली होती.
ग्रामीण भागातील वाढत्या समृद्धीमुळे ट्रॅक्टरला मागणी वाढत आहे. पहिल्यांदाचा ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्यांकडून जास्त हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरला मागणी आहे. देशाच्या उत्तर आणि पूर्व भागाच्या तुलनेत दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रातून ट्रॅक्टरला अधिक मागणी आहे. सध्या ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या सुट्या भागाचे उत्पादक उत्पादन वाढवण्यासाठी कार्यरत आहेत. त्याचबरोबर ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या बहुतेक कंपन्या क्षमतेच्या 80 टक्क्यांपर्यंत उत्पादन करत आहेत.
ट्रॅक्टरची मागणी वाढल्याने त्यासाठी कर्ज देणाऱ्या बिगरबँकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) तसेच बँका झपाट्याने काम करू लागल्या आहेत. भक्कम ग्रामीण अर्थव्यवस्था, ट्रॅक्टरला असलेली जबरदस्त मागणी आणि सुट्या भागाचे उत्पादन करत असलेल्या कंपन्यांकडून वाढवले जात असलेले उत्पादन लक्षात घेता ऑक्टोबर महिना हा ट्रॅक्टर उत्पादक क्षेत्रासाठी आणखी एक विक्रम करणारा ठरण्याची चिन्हे आहेत.