सदानंद हे एक उत्कृष्ट कथालेखक होते परंतु त्यांच्या कथा कोणीही वाचत नव्हते. म्हणून त्यांनी कथाकथन करणे सुरू केले परंतु त्यांच्या कथाही कोणी ऐकल्या नाहीत. थोडक्यात सदानंद एक अपयशी लेखक आणि कथाकथन कार होते. सावित्री ही त्यांची पत्नी, सदानंदांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणारी.पराग हा एका नावाजलेल्या कॉलेजमधून एम बी ए ची पदवी प्राप्त केलेला त्यांच्या मित्राचा मुलगा.
गुड मॉर्निंग काका, येऊ का? परागने विचारले. पराग मी तुझीच वाट पाहत होतो म्हणत सदानंदांनी परागचे स्वागत केले. अरे येऊ का म्हणून काय विचारतोस? नेहेमीच तर ते फ्री असतात. सदैव घरात असतात, काय काम आहे त्यांना, आतून सावित्रीबाई म्हणाल्यात. सदानंदांवर टीका करण्याची कोणतीही संधी सावित्रीबाईंनी आयुष्यात कधीच दवडली नव्हती.
काका, तुम्ही मला तुमच्या सर्व कथा ऐकवा, पराग म्हणाला. आज सुदैवाने सदानंदांना प्रथमच कोणीतरी श्रोता मिळाला होता. सदानंद कथा ऐकवत असताना पराग पॉईंट्स नोट करत होता. काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, बघा मी तुम्हाला कसा यशस्वी करतो ते, पराग म्हणाला. परागचे बोलणे ऐकून सदानंदांना हायसे वाटले. तुम्ही मला १०,००० रुपये द्या, पण माझ्या पप्पांना मात्र याबद्दल काही सांगू नका. सदानंदांकडून १०,००० रुपये घेऊन पराग गेला.
आठ दिवसांनी अगदी सकाळीच पराग उगवला. काका, या महिन्याच्या २५ तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळात मी तुमचा प्रोग्रॅम प्लॅन करतोय. हा वेळ तुम्ही प्रोग्रॅम साठी फ्री ठेवा सांगताना त्याने कोणत्या गोष्टी सांगायच्या तेही सदानंदांना सांगितले. चहा, नाश्ता झाल्यावर अगदी हळू आवाजात पराग म्हणाला, या प्रोग्रॅमच्या जाहिरातीसाठी मला तुम्ही १५,००० रुपये द्या, परंतु माझ्या पप्पांना याबद्दल काही सांगू नका. सदानंदांचा खिसा १५,००० रुपयांनी हलका करून पराग गेला.
अहो, आपले १०,००० परत केलेत का परागने? नाही, अजून १५,००० घेऊन गेला, पप्पांना सांगू नका म्हणत. परागला तुम्ही मागच्या आठवड्यात १० आणि आता १५ असे २५,००० रुपये दिलेत आणि तो सांगतोय माझ्या पप्पांना याबद्दल काही सांगू नका. मला तर बाई यात काहीतरी काळं बरं वाटतंय, म्हणत सावित्रीबाईंनी संशय व्यक्त केला.
त्यानंतर सदानंदांनी परागला फोन करण्याचा दोन-तीनदा प्रयत्न केला परंतु त्याने फोन उचलला नाही. काल तर हद्दच झाली. सदानंद आणि सावित्रीबाई एका मॉलमध्ये गेले होते त्यावेळी तेथील कॅशियर एका तरुणाला विचारत होता, सर तुमच्या बिलाचे २५,००० रुपये तुम्ही कॅश देणार की कार्डने? कॅशच घ्या, तो तरुण उत्तरला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून सदानंदांनी निरखून बघितले. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर परागच होता. सदानंदांनी परागला हाक मारली परंतु दुर्लक्ष करत तो निघून गेला. सदानंदांच्या मनातही पराग बद्दल आता शंका निर्माण झाली होती.
ऐकलंत का? सावित्रीबाई सांगत होत्या, माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की पुढच्या आठवड्यात एका मोठ्या माणसाचा कथाकथनाचा कार्यक्रम आहे आणि जो ही तो कार्यक्रम अटेंड करेल त्याला पाचशे रुपये मिळणार आहेत. सावित्री अगं तू नीट ऐकलं नसेल, ५०० रुपये फी असेल. नीट माहिती काढ. खरोखरच प्रत्येकी ५०० रुपये मिळणार असतील तर आपण दोघेही जाऊ म्हणजे आपल्याला १००० रुपये मिळतील मग तुला छानशा हॅाटेलात डिनरला नेईन, सदानंद म्हणालेत.
काका आज संध्याकाळी सहा वाजता आपला प्रोग्रॅम आहे. मी साडेपाच वाजता तुमच्या घरी येईन, तुम्ही तयार राहा. छान कुर्ता, पायजमा, कोल्हापूरी चप्पल, स्वच्छ पुसलेला चष्मा, सदानंद तयारच होते. आज अजिबात पैसे देऊ नका त्याला, सावित्रीबाईंनी ठासून सांगितले. बरोबर साडेपाच वाजता पराग आला. कडक इस्त्रीचा पांढरा स्वच्छ शर्ट, निळे ब्लेजर आणि चकचकीत पॅालिश केलेले बुट घालून रूबाबदार दिसत होता पठ्ठ्या. लगेचच पराग नी सदानंद कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला निघालेत.
अरे वा पराग, छान गाडी आहे, अगदी नवीकोरी दिसते. गाडी तुझी की बाबांची? सदानंदांनी विचारले.
काका भाड्याची गाडी आहे, आपल्याला कार्यक्रमाच्या जागी नेण्यासाठी.
पराग, भाडे किती आहे गाडीचे? सदानंदांनी विचारले.
फक्त १००० रूपये.
काय हे पराग? अरे आपण रिक्षाने ५० रुपयात पोहोचलो असतो आणि तू गाडीचे १००० रुपये देणार. चील काका चील, म्हणत परागने सदानंदांना शांत केले. काका, तुमचा बॅंक बॅलन्स किती असेल? साधारणतः २.५ ते ३ लाख. का विचारलेस पराग? काका अगदी सहज म्हणताना पराग काहीतरी लपवत असल्याचे सदानंदाना स्पष्टपणे जाणवले. तेव्हढ्यात ते कार्यक्रमाच्या जागी पोहोचले.
किती लोक असतील कार्यक्रमाला? सदानंदांनी विचारले. २०० लोक असतील, पराग म्हणाला. माझ्या कार्यक्रमाला आणि २०० लोक? सदानंद अवाक झालेत.
मोठा हॅाल, मधोमध छानसे स्टेज आणि भरपूर गर्दी पाहून सदानंदांना आश्चर्याचा धक्काच बसला. परागने नक्कीच काही तरी युक्ती वापरली असणार एवढ्या लोकांना जमवायला. “यु आर ग्रेट पराग, मानलं तुला”, सदानंद मनातल्या मनात म्हणाले. सदानंदांचे स्टेजवर आगमन होताच, उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
येथे उपस्थित असलेल्या १०० कपल्स म्हणजेच २०० लोकांचे मी मनापासून स्वागत करतो. जाहिरातीत आम्ही म्हटले होते की, सर तुम्हाला ३ गोष्टी सांगतील आणि त्या ३ गोष्टींपैकी एकही गोष्ट तुम्हाला आवडली नाही तर तुम्हाला प्रत्येकी ५०० रुपये दिले जातील. सदानंदांनी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन केले ५०० रुपये प्रत्येकी आणि २०० लोक म्हणजे एक लाख रुपयांचा फटका.
मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की सदानंद सरांनी या स्कीममध्ये थोडा बदल केला आहे जो तुमच्याच फायद्याचा आहे आणि तो बदल असा की जर या तीन गोष्टींपैकी एकही गोष्ट एखाद्या कपलला आवडली नाही तर त्यांना ५०० अधिक ५०० असे १००० रुपये देण्याऐवजी त्यांना २००० रुपये दिले जातील. उपस्थितांनी या बदलाचे जोरदार स्वागत केले.
सदानंदांच्या मनात कॅल्क्युलेशन तयार होते आता फटका १ लाखाचा नव्हे तर २ लाखांचा बसणार होता. अच्छा, म्हणूनच परागने मला माझा बँक बॅलन्स विचारला आणि मी मूर्खानेही त्याला खरा बॅलन्स सांगितला. आपण उगीचच या मुलाच्या नादी लागलो, सदानंदांना हार्ट अटॅक येणे तेवढे बाकी होते.
पराग काय केलेस हे? माझे बँक खाते रिकामे होईल रे, सदानंद निराशेने म्हणालेत. काका तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि अगदी रंगवून गोष्टी सांगा, आपल्याला आपले दोन लाख रुपये वाचवायचे आहेत.
सदानंदांनी अगदी मन लावून पहिली गोष्ट सांगितली. गोष्ट सांगून होताच पराग पुढे आला आणि त्याने उपस्थितांना विचारले, आपल्यापैकी किती लोकांना ही गोष्ट आवडली? फक्त २० पुरुषांनी हात वर केला.
थोडंसं नुकसान कमी झाल्यामुळे सदानंदांना बरे वाटले. वेल डन. काका आता पुढची गोष्ट अजून छान सांगा, परागने सांगितले. पुढची गोष्ट खूप छान रंगली. गोष्ट संपल्यावर परागने श्रोत्यांना विचारले, आपल्यापैकी किती लोकांना ही गोष्ट आवडली? एकाही पुरुषाने नाही पण ३० स्त्रीयांनी हात वर केला. नुकसानाची रक्कम अजून कमी झाल्याने सदानंदांचा आत्मविश्वास वाढला.
काका आता तिसरी गोष्ट अगदी उत्तम होऊ द्या, ऑल द बेस्ट. सदानंदांनी सुरुवात केली. मी आपणापुढे सादर करणाऱ्या कथेचे नांव आहे “बायकोचा भाऊ यमदूत की देवदूत”? घरोघरीचा अत्यंत ज्वलंत प्रश्न असल्याने, श्रोते अगदी मन लावून ऐकू लागले.
गोष्टीच्या पूर्वार्धात सदानंदांनी बायकोचा भाऊ हा “यमदूत” कसा हे अगदी व्यवस्थित पटवून दिले. परागने पुढे येऊन सांगितले, गोष्टीचा पूर्वार्ध संपला आहे. त्याने पुरुष मंडळींना विचारले की आपल्यापैकी किती लोकांना ही गोष्ट आवडली? समस्त पुरुष मंडळीने गोष्ट आवडल्याचे एकमताने सांगितले.
उत्तरार्धात बायकोचा भाऊ हा “देवदूत” कसा हे सदानंदांनी पटवून दिले. आपण समस्त पुरुष मंडळी सख्ख्या अथवा जवळच्या नात्यातील बहिणींचे भाऊ, म्हणजेच कुणाच्यातरी बायकोचे भाऊ. बहीणीच्या रक्षणासाठी आणि मदतीसाठी सदैव हजर राहणारे. मग आपण यमदूत कसे? आपण तर “देवदूत”. समस्त महिला मंडळीने सदानंदांकडे मोठ्या प्रेमाने, आपुलकीने, आदराने आणि श्रद्धेने बघितले. काही महिलांनी तर सदानंदांना चक्क नमस्कार केला.
सदानंदांचे २ लाखांवरचे नुकसान शून्यावर येऊन ठेपले होते. पुढे येऊन परागने सर्वांचे आभार मानले आणि त्याने अनाउन्स केले की पुढील आठवड्यात सरांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे, अर्थात वेगळ्या कथांचा. आपल्यासाठी एक खास ऑफर अशी आहे की या कार्यक्रमाचे तिकीट १००० रुपये आहे परंतु आपल्यासाठी ते फक्त ४०० रुपयांत उपलब्ध आहे आणि त्यावर सरांनी अजून एक ऑफर दिली आहे जर आपण कपल म्हणून उपस्थित राहिला तर तुम्हाला ४०० अधिक ४०० असे ८०० रुपये लागणार नाहीत तर दोन तिकीटे फक्त ४०० रुपयांत मिळेल, म्हणजे नवऱ्या बरोबर बायको फ्री. बायको ऐवजी मैत्रीण असली तरीही चालेल, आम्ही त्याची वाच्यता करणार नाही. सर्वत्र एकच हशा पसरला.
ह्या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर आपण रिसेप्शनमध्ये कपलचे ४०० रुपये भरून नांव आणि मोबाईल नंबर द्या. साधारणतः पंधरा मिनिटांनी परागने सरांना ४०,००० रुपये दिलेत, पुढच्या प्रोग्रॅमच्या अॅडव्हान्स बुकिंगचे.
पराग सोबत एक अतिशय देखणी, दागिन्यांनी मढलेली आधुनिक तरूणी होती. सर, या आहेत, मिस नेहा, पुण्यातील नावाजलेल्या दागिन्यांच्या दुकानाच्या मालकीण बाई. पुढच्या प्रोग्रॅमच्या स्पॉन्सरशिपचा दोन लाख रुपयांचा चेक सरांना देऊन नेहाने सरांबरोबर सेल्फी घेतला आणि लगेचच तो फेसबुक, इन्स्टा, व्हॅाट्सअॅप चा स्टेट्स आणि डी पी वर टाकला. सदानंद सर क्षणात सेलिब्रिटी झालेत.
सदानंदांचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. त्यांचा प्रोग्रॅम आज दोनशे लोकांनी अटेंड केला, त्या सर्वांना तो आवडला आणि विशेष म्हणजे पुढच्या कार्यक्रमाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे ४०,००० रूपये आणि २ लाखांची स्पॉन्सरशिप, सगळेच अगदी स्वप्नवत होते. सदानंदनी मनापासून मान्य केले की जे काही झाले ते “बायकोच्या भावामुळेच” म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईल मधील “यमदूत” हे त्यांच्या बायकोच्या भावाचे नांव बदलून ते “देवदूत” असे केले. परागचा आणि त्या सुंदर तरुणीचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेऊन सदानंद मोठ्या आनंदाने घरी परतलेत.
प्रोग्रॅम खूपच छान झाला, ग्रॅंड सक्सेस असे सांगत त्यांनी ४०,००० रूपयांची कॅश आणि दोन लाख रुपयांचा चेक सावित्रीबाईंकडे सुपुर्द केला. अहो तुम्ही प्रोग्रॅम साठी गेलात आणि थोड्याच वेळात माझ्या बंधू राजाचा तुम्हाला बेस्ट विशेस देण्यासाठी फोन आला. त्याच्या बेस्ट विशेस मुळेच तर तुमचा प्रोग्रॅम यशस्वी झाला. सावित्रीबाईंनी सदानंदांच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या बंधु राजाला दिले होते.
तुमचा फोन द्या, मी माझ्या भावाला फोन करते म्हणत सावित्रीबाई सदानंदांच्या फोनवर त्यांच्या भावाचे नांव शोधू लागल्या. कसे सापडणार ते? नुकतेच सदानंदांनी यमदूताला देवदूत केले होते ना! किती दुष्ट हो तुम्ही, माझ्या भावाचे नांवच डिलीट केले तुमच्या फोन मधून.
तेव्हढ्यात सदानंदांचा फोन वाजला. घ्या तुमच्या देवदूताचा फोन, चिडून सावित्रीबाई म्हणाल्या. चिडू नकोस प्रिये, फोन तुझ्या भावाचा आहे, मीच त्याला अपग्रेड करून देवदूत नांव दिले. पुढील १० मिनीटे देवदूताशी बोलून सावित्रीबाईंनी फोन ठेवला नी परत फोन वाजला.
नमस्कार मी पत्रकार पोपटलाल बोलतोय, तुफान एक्स्प्रेस मधून. आजची ब्रेकिंग न्युज, विख्यात लेखक आणि कथाकथन कार सदानंद सरांना १० लाखांची स्पॅान्सरशिप जाहीर. सरांना १० लाख रुपये पाठवायचे आहेत. त्यांचे बॅंक अकाऊंट डिटेल्स देतात का?
पोपटलाल साहेब, सदानंद सरांच्या यशाचा शिल्पकार माझा भाऊ आहे. तुम्ही असं करा माझ्या भावालाच पैसे ट्रान्स्फर करा.
मॅम, पण त्यासाठी सरांची अनुमती लागेल. सावित्रीबाईंनी फोन सदानंदाना दिला.
पोपटलाल साहेब, मॅम म्हणतात तसेच करा. माझी अनुमती आहे. अहो,
बायकोचा भाऊ
तो तर लोण्यापेक्षा मऊ
त्याला जीव लाऊ
आणि सदैव सुखी राहू
हाच तर आहे, सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र.
मी उगीचच परागवर संशय घेतला, सावित्रीबाई ओशाळून म्हणाल्या. फोन करून आभार माना त्याचे.
जशी तुझी आज्ञा म्हणत सदानंद फोन करणार तेव्हढ्यात परागचाच फोन आला.
काका, मी तुमच्या प्रोग्रॅम्सचे पुढच्या ३ महिन्यांचे प्लॅनिंग करतोय. जाहिरातीसाठी मला १ लाख रुपये हवे आहेत, हे माझ्या पप्पांना मात्र सांगू नका.
अजिबात संशय घेऊ नका, परागला पैसे अगदी बिनधास्त द्या. खूप गुणी मुलगा आहे तो. सावित्रीबाईंनी प्रेमळ सल्ला दिला.
-दिलीप कजगांवकर