काल बाजारातून फिरत असताना अचानक एका मित्रासोबत भेट झाली. बऱ्याच दिवसानंतर भेट झाल्याने दोघांनी थेट जवळचे एक हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये चहाची ऑर्डर देऊनर गप्पागोष्टींना सुरुवात झाली. इकडच्या तिकडच्या आणि जुन्या गप्पा रंगल्या. चर्चेच्या ओघात त्याने चुकीच्या लोकांच्या संगतीत गेल्याने व्यवसायात कसे नुकसान झाले याबाबत सांगितले. तसेच मला माणसंच ओळखता येत नाहीत. पटकन विश्वास ठेवून नंतर कशी पश्चातापाची वेळ येते याबाबत त्याने स्वतःचे अनुभव सांगितले. मलाही थोडे वाईट वाटले. परंतु त्या तिथे काहीही सल्ला न देता आम्ही फळभाज्या खरेदीसाठी बाजारात शिरलो. बाजारात एका भाजीविक्रीच्या दुकानाजवळ आम्ही थांबलो. तिथे कांदे बटाटे दोन वेगवेगळ्या टोपलीत विक्रीसाठी होते. माझ्या मित्राने विचारले, “”कांदे कसे किलो दिले?”
भाजीविक्रेत्याने एका टोपलीतील कांद्याचा भाव 30 रुपये किलो तर दुसऱ्या टोपलीतील कांद्यांचा भाव 50 रुपये किलो सांगितला. माझ्या मित्राने चाचपून पाहिले आणि 50 रुपये किलो भावाने असणारे कांदे खरेदी केले. मी त्याला विचारले, “”काय रे, एकीकडे 30 रुपये किलोने कांदे असताना तू 50 रुपये किमतीचे का खरेदी केलेस?” त्यावर तो तत्परतेने म्हणाला, “”अरे 30 रुपये किलो असणाऱ्या कांद्यांत एक दोन कांदे खराब होते. त्यामुळे त्या टोपलीतील इतर कांदेही खराब होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे मी चांगल्या दर्जाचे कांदे खरेदी केले.”
मी हसत हसत त्याला म्हणालो, “”अरे मग कांद्याप्रमाणेच माणसांचीही निवड करायला शिक ना?”
मी कोणत्या उद्देशाने बोललो हे त्याला समजले. ‘”खरं आहे तुझं” असं म्हणत ते स्वीकारत खांद्यावर हात टाकून तो माझ्यासह पुढे चालू लागला.
माणूस भौतिक किंवा इतर गोष्टी खरेदी करताना किंवा निवडताना अगदी सूक्ष्म पारख करतो. परंतु आपली संगत निवडताना मात्र चुकतो आणि मग यातूनच विश्वासघात, फसवणूक, खोटारडेपणा आणि नकारात्मक छबी अशा संकल्पना उदयास येतात. आपण कोणत्या लोकांबरोबर राहतो यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दर्जा ठरत असतो. अळूच्या पानाच्या संगतीने पाणी सुद्धा हिऱ्यासारखे चमकते किंवा त्याला परिस स्पर्श होतो. परंतु तेच पाणी एखाद्या नाल्याला मिळाल्यास लोक त्यापासून दूर राहतात.
आपल्याला योग्य संगत निवडता आली पाहिजे. कोणत्या लोकांच्या संगतीने आपल्याला यश, कीर्ती आणि सकारात्मकता मिळणार आहे हे आपण जाणले पाहिजे. परंतु हल्ली माणसं ओळखणं कठीण झालंय हो? त्यामुळे चांगली माणसं कशी निवडायची? असा प्रश्न अवश्य विचारला जातो. आपल्या आयुष्यात आपण जी माणसे निवडतो ती आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत असतात. म्हणूनच माणसे निवडताना, त्यांच्या संपर्कात राहताना आपल्याला खालील काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
सकारात्मक विचारसरणी – माणसे जोडताना आपण त्यांचा स्वभाव जाणून घ्यायला हवा. त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. सातत्याने नकारात्मक गोष्टींचा उल्लेख करणाऱ्या लोकांपासून लांब राहायला हवे. स्वतःबद्दल, इतरांबद्दल, कामाबद्दल किंवा आव्हानाबद्दल बोलतानाही त्यातून साकारात्मकतेची झलक दिसायला हवी.
आदरभाव जपणारी – आदराने वागणारी आणि आदरभाव जपणारी माणसे नेहमी हिताची ठरतात. इतरांचे मत ऐकून घेणारी, मताचा आदर करणारी माणसे आपल्या सभोवती असल्यास आदरभाव वृद्धिंगत होऊन नाती दृढ होतात. अशी माणसे आपल्याप्रती आदराने वागून आपल्या कृतीला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची ठरतात.
तुमच्या वाईट काळात तुमचे मूल्य न करणारी – चांगली-वाईट वेळ ही प्रत्येकावर कधी ना कधी येत असते. त्यातही वाईट वेळ जीवनाला अनुभवसंपन्न करीत असते. त्यामुळे आपल्या वाईट वेळेवर आपले मूल्य ठरविणारी लोक आपल्यासाठी अयोग्य ठरतात. अशी माणसे अवश्य टाळावीत.
तुलना नाही प्रगतीचा विचार करणारी – आपल्या यशाशी, कर्तृत्वाशी स्वतःची तुलना न करता आपल्या प्रगतीवर समाधान व्यक्त करणारी माणसे जोडावीत. अशी माणसे आपल्याप्रती स्वार्थ, ईर्षा किंवा सूडाच्या भावनेने न वागता आपल्या प्रगतीसाठी प्रार्थना करतात. या लोकांच्या सहवासाने आपल्याला अधिक उंच भरारीची प्रेरणा मिळत असते. वर्तमानातच नाही तर भविष्यातही चपखल बसणारी- काही माणसे केवळ ठराविक काळापुरती आपल्याबरोबर असतात.
स्वतःचे काम किंवा स्वार्थ साधला की, आपल्याला विसरतात. अशी माणसे वेळीच ओळखावीत. जी माणसे आपल्या भूतकाळाला समजून वर्तमानात साथ देऊन भविष्यातही खांद्याला खांदा लावून उभे राहतील अशी माणसे अवश्य जोडावी. तुमची संगत तुमच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या समाजात निर्माण करीत असते. म्हणूनच जीवनाला यशाची किनार देणाऱ्या संगतीसाठी वरील गोष्टी अवश्य पाहाव्यात.
सागर ननावरे