उंच आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणे आणि प्रत्यक्ष अंतराळयानात बसून ग्रहतार्यांच्या नभांगणात झेपावणे व तिथे वास्तव्य करणे यामध्ये महद्अंतर आहे. अंतराळसङ्गरीवर जाण्याचा विचारही जिथे आपण करत नाही तिथे भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स ही अंतराळयात्री आठ दिवसांच्या स्पेस टूरवर गेली आहे. बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्या ठरल्या. परंतु, आता सुनीता यांच्या पृथ्वीवर परतण्याविषयी काही आव्हाने निर्माण झाल्याने काळजीचे ढग जमा झाले आहेत.
जगभरातील भारतीय, अंतराळ संशोधन क्षेत्रातील शास्रज्ञ आणि असंख्य जण पुन्हा एकदा सुनीता विल्यिम्स यांच्याविषयीच्या काळजीने चिंतातूर झाले आहेत. याचे कारण जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अभ्यासासाठी गेलेल्या सुनीता विल्यिम्स यांना सहकार्यांसह पृथ्वीवर परतण्यात अडचणी येत आहेत.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स 5 जून 2024 रोजी स्टारलाइनर नावाच्या अंतराळयानाने अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. हे अमेरिकन विमान कंपनी बोइंग आणि नासा यांचे संयुक्त ’क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ आहे. यामध्ये सुनीता या यानाच्या पायलट आहेत. त्यांच्यासोबत आलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर आहेत. हे दोघेही 8 दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहिल्यानंतर पृथ्वीवर परतणार होते, परंतु अद्याप तसे झालेले नाही.
स्टारलाइनरचे प्रक्षेपण गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले. अखेर 5 जून रोजी या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले आणि 25 तासांच्या प्रवासानंतर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या. सुनीता यांच्या नावावर हा आणखी एक ऐतिहासिक विक्रम आहे. प्रक्षेपणासह अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाण्याच्या मोहिमेवर काम करणारी बोइंग दुसरी खासगी कंपनी बनली. याआधी एलन मस्क यांच्या स्पेसएक्सने ही कामगिरी केली होती.
ताज्या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना संशोधन आणि प्रयोग करण्यासाठी 8 दिवस अंतराळ स्थानकावर थांबावे लागले. तथापि, या मोहिमेचा मुख्य उद्देश अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर आणि मागे नेण्याची अंतराळयानाची क्षमता सिद्ध करणे हा होता. सुनीता आणि विल्मोर हे पहिले अंतराळवीर आहेत ज्यांना ऍटलस व्ही रॉकेट वापरून अंतराळ प्रवासात पाठवले गेले आहे. या मोहिमेदरम्यान त्यांना अंतराळयान हाताने उडवावे लागले. या उड्डाण चाचणीशी संबंधित अनेक प्रकारचे उड्डाण चाचणी उद्दिष्टेही पूर्ण करावी लागली.तथापि, बोइंगचे अवकाशयानात अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याचे समोर आले आहे. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासा आपल्या अंतराळवीरांबाबत कोणतिही जोखीम उचलण्यास तयार नाहीये.
अर्थात हे दोघेही अंतराळयात्री खूप अनुभवी आणि प्रशिक्षित आहेत; पण त्यांचा जीव कोणत्याही स्थितीत धोक्यात जावू नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेत छोटीशी जरी चूक झाली किंवा उणीव राहिली तर या दोन्ही अंतराळप्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. तसे झाल्यास स्पेस सुपरपॉवर असणार्या अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसेल आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. चीनकडून अवकाश कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले जात असताना, चंद्रावरील पाण्याबाबत दावे केले जात असताना आणि अमेरिकेला शह मिळत असताना सुनीता विल्यम्स यांची मोहीम सुरक्षितपणे पार पडणे महत्त्वाचे ठरत आहे. भारतीयांना आपल्या मातीशी जोडलेल्या कन्येची अधिक काळजी आहे. कारण अंतराळवीर कल्पना चावला यांना गमावल्याचे दु:ख तमाम भारतीयांच्या मनात अजूनही आहे. हरियानाच्या या लाडल्या कन्येला अवकाश मोहिमेदरम्यान जीव गमावावा लागला आणि ते दु:ख विसरलेले नाही. याचे कारण 2003 मध्ये कल्पना चावला या भारतीय वंशाच्या अंतराळवीर होत्या. 2003 मध्ये त्यांचे स्पेस शटल कोलंबिया पृथ्वीवर परत येताना आगीच्या गोळ्यात बदलले होते. या दुर्घटनेत कल्पना चावलासह इतर सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी 1986 मध्ये स्पेस शटल चॅलेंजरच्या स्ङ्गोटातही अनेक अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच ‘नासा’ यावेळी नव्या प्रकाराने सर्वती खबरदारी घेण्यात गुंतली आहे.
सध्याच्या बातम्या पाहता सुनीता विल्यम्स यांना आठ महिने तेथे मुक्काम करावा लागणार आहे. अर्थात अशा प्रकारे अवकाशात अनिश्चिततेच्या वातावरणात अडकणे हे नक्कीच जीवाला घोर लावणारे आहे. मात्र सुनीता या धाडसी अंतराळवीर आहेत. आपण नक्क्कीच पृथ्वीवर परत येऊ, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी नासाच्या मोहिमेवर विश्वास व्यक्त केला आहे.
लढाऊ हेलिकॉप्टरचे सारथ्य करणार्या सुनीता यांनी अवकाश स्थानकापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. ही त्यांची तिसरी अवकाश मोहीम आहे. बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्या ठरल्या. अंतराळवीर कोणताही असो त्याला कठीण प्रशिक्षणातून आणि प्रबळ मानसिकतेतून तयार केले जाते आणि मोहिमेत सामील करून घेतले जाते. मात्र अंतराळवीरच्या आयुष्यात प्रत्येक क्षण जोखमीचा असतो आणि ही जोखीम जीवाशी निगडित असते.
बोइंगचे स्टारलायनर अवकाश स्थानकावर उतरले तेव्हापासूनच सुनीता विल्यम्स यांच्या माघारी दौर्याच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली. त्यात अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. यानाची दिशा निश्चित करणारे पाच थ्रस्टर्स बंद पडले. कालांतराने हीलियम गॅसही संपला. म्हणून त्याला आता पर्यायी इंधनावर राहवे लागेल. ‘नासा’ने आपल्या अंतराळवीरांना अवकाशात नेणाण्यासाठी व्यावसायिक उड्डाणांसाठी बोइंग आणि स्पेस एक्सशी अब्जावधी रुपयांचा करार केला आहे. आतापर्यंत नऊ मानवी अवकाश मोहिमा पार पाडणार्या स्पेस एक्सवर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोरला परत आणण्याची जबाबदारी सोपविली. ‘नासा’ने अवकाश मोहिमांतील संभाव्य अडथळे आणि संकटांचे आकलन करत निर्णय घेतलेला होता. तूर्त सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना ङ्गेब्रुवारी 2025 पर्यंत अवकाश स्थानकात राहावे लागणार असून तसा निर्णय ‘नासा’ने घेतला आहे. याप्रमाणे ते स्पेस एक्स क्रु अवकाशयानातून पृथ्वीवर परततील. यात दोन अंतराळवीर जातील आणि परतीच्या प्रवासात सुनीता आणि विल्मोर असतील.
पुढील सहा महिन्यांपर्यंतचा त्यांचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे. यादरम्यान त्या अवकाश स्थानकावर शास्त्रीय कार्य करतील आणि यानाची डागडुजी तसेच स्पेस वॉक देखील करणार आहेत. यादरम्यान, बोइंगच्या दर्जावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. उड्डाणानंतर प्राथमिक स्थितीत असतानाच यानातून हीलियमची गळती होत असल्याचे संकेत मिळाले. मागच्या वेळी देखील बोइंगच्या अनेक अवकाश मोहिमा समाधानकारक राहिलेल्या नाहीत. दुसरीकडे बोइंगची स्पर्धक कंपनी असणार्या एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळवले आहे. चार वर्षांपूर्वीच चिनी अवकाश यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत धडक मारली. तसेच अंतराळवीरांसह सामानाची ने आण करण्याचे कामही यशस्वीपणे केले आहे आणि आजही करत आहे. त्यामुळे बोईंगबाबत टीकेची झोड उठली आहे.
सुनीता विल्यम्स या एका प्रायोगिक अभियानांतर्गत अवकाश केंद्रात गेल्या. मात्र आता त्यांना सहा महिने तेथेच काढावे लागणार आहेत. सुनीता या नाताळ आणि नव्या वर्षाचे स्वागत अवकाशातच करणार आहेत. सुनीतांची अवकाश स्थानकाची तिसरी वारी आहे. त्या अनुभवी अंतराळवीर आहेत. अलिकडेच त्यांनी म्हटले, अवकाश स्थानकातील जबाबदारी पार पाडण्यात मी व्यग्र आहे. अवकाश स्थानकात गुरुत्वाकर्षण मुक्त वातावरणात तरंगणे अनुभवत आहे, असेही त्या म्हणाल्या. एकप्रकारे त्या अवकाशातील घरात वापसी झाल्याचे मानत आहेत. टीमबरोबर अभ्यास आणि संशोधनाचे काम करण्याचा अनुभव सुखद असल्याचे त्या म्हणतात. खरे तर अंतराळवीरांना आपल्या प्रवासात अचानक निर्माण होणार्या प्रत्येक आव्हानांचा आणि बिकट स्थितीचा मुकाबला करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक रुपाने सज्ज राहावेच लागते. परंतु गुुरुत्वाकर्षणविरहित स्थिती, झोपमोड, डोळ्यांवर पडणारा अतिरिक्त दबाव, समाजापासून दूर राहत एकांतपणा आणि भावनाशून्य स्थिती या गोष्टी संवेदनशील व्यक्तीचे खच्चीकरण करण्याचे काम करु शकतात. त्याचवेळी स्नायूंचे वजन कमी झाल्याने अनेक प्रकारच्या अडचणी देखील येतात. सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी सुखरुप परततील, अशी आशा करु.
– प्रा. विजया पंडित