आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपणासमोर अनेक समस्या दत्त म्हणून उभ्या असतात. पण त्यांचा सामना सर्वच व्यक्ति योग्य पद्धतीने किंवा योग्य मार्गाने करतात का? तर निश्चितच नाही, पण हे असे का होते याचा विचार कधी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे का? असेल किंवा नसेल तरीही आपले सकारात्मक विचार हा महत्त्वाचा घटक आपल्या समस्यांवर एकमेव उपाय असतो पण हे बहुतांश वेळी आपल्या लक्षातच येत नाही. कारण आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी घडत असतात. कुठलीही समस्या आली तरी ती सहज अतिशय कुशाग्रपणे सकारात्मक विचारांच्या मदतीने सोडविणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार करीत असताना आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळासंदर्भात देखील विचार करावा लागतो. कारण मानव असा आहे की, त्याच्या बुध्दिच्या जोरावर व वाचाक्षमतेमुळे तो इतर प्राण्यापेक्षा भिन्न आहे. त्याला दुःखाचे किंवा वाईट गोष्टीचे पाढे वाचण्यास खूप आवडतात.आणि त्याच विचारांमधून व्यक्तिचे आयुष्य व कृती घडत असतात.
त्यातुनच तसेच वळण विचारांना, पंचज्ञानेद्रिंयांना व शरीराला लागते पर्यायाने आपल्या शरीरातील सर्वच पेशी देखील तशाच कार्य करण्यास सुरुवात करतात. उदा, आपण असे बर्याचदा म्हणतो की, उपवास असल्यावर काही खाल्ले नाही तर माझे डोके दुखते हाच विचार तुमच्या शरीरातील पेशी जागृत करुन तुम्ही उपवास केल्यावर डोके दुखण्यास भाग पडतात. उपवास व डोके दुखण्याचा विचार याचा घनिष्ट संबंध आहे हे आपण मनाशी पक्के करतो त्यामुळे या गोष्टी घडतात. तसेच चहा घेतला नाही तर फ्रेश न वाटणे , मुलांना परिक्षेची भिती , नोकरीच्या शोधात असणार्यांना मुलाखतीची भिती इ.गोष्टी आपल्या विचारांवर अवलंबून आहेत. अगदी याऊलट आपण उच्चध्येयाने प्रेरित असल्यास, आपल्या विचारांची दिशा निश्चित असल्यास तसेच आपले प्रयत्न प्रामाणिक असल्यास यशप्राप्तीही निश्चितच असते यात तिळमात्र शंका नसते, जीवनात यश प्राप्त करण्यासाठी ध्येय किंवा स्वप्न ही स्पष्ट असावी तेथे कुठेही संदिग्धता नसावी
किंवा द्विधा मनःस्थिती नसावी त्यामुळे विचारांमध्ये अडथळे येत नाही. यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार करावेत. सकारात्मक विचार करीत असताना “तुम्ही जसा विचार करता तसेच होता” म्हणजेच काय तर, सतत तुम्ही मी आनंदी आहे याचा विचार केला तर तुम्ही आनंदीच राहाल.
आपले सकारात्मक विचार आपले आयुष्य बदलवून टाकतात. उदा. झोपडपट्टीत राहणारा मुलगाही उच्चशिक्षणाची स्वप्ने पाहतो त्यावेळी तो अपार मेहनत करुन, कष्ट करुन, त्याग करुन उच्चशिक्षण घेऊन उच्चपदावर पोहचतो. याची समाजामध्ये खूप उदाहरणे आहेत. यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास दाखविणे महत्वाचे आहे, त्यांना सतत टाॅर्चर करु नये, इतर मुलांशी तुलना करु नये, तुला काहीच येत नाही, हे तू करुच शकत नाही, या नकारात्मक विचारांपासून पालकांनी दूर राहावे . जास्तीत जास्त प्रेरणा (Motivation) देण्याचा प्रयत्न करावा, मुलांना कसलाही धाक दाखवू नका त्यामुळे मुले घाबरट होतात, अबोल होतात, आपले मत व्यक्त करत नाही यातुनच मुले एकलकोंडी बनतात. पर्यायाने ही मुले विरोधी वर्तन देखील करताना दिसून येतात.
म्हणजे उर्मटपणा, पालकांचे काहीही न ऐकणे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणे इ. वर्तन घडून येताना दिसते. पालकांनी मुलांचे संगोपन करीत असताना त्यांचे जास्त हट्टही पुरवू नये तसेच जास्त दुर्लक्षही करू नये. पालकांनी मुलांच्या संदर्भात आपले वर्तन लवचिक ठेवावे. कधी लाडही करावे, हट्टही पुरवावेत, प्रेमही करावे आणि योग्य तेथे शिक्षाही करावी. यामुळे मुलांचे आयुष्य घडण्यामध्ये अडचणी निर्माण होत नाही. मुलांची कुठे चूक झाली हेही समजावून सांगावे तसेच चांगल्या गोष्टींचे मनापासून कौतुक करावे. पालकांनी म्हणजेच आई-वडिलांनी मुलांच्या बाबतीत जास्त आधिकारशाहीने वागू नये, पूर्ण दुर्लक्ष देखील करु नये, खूप मोकळीक देखील देवू नये तर अधिकृत शैलीचा ( Authoritative Style) वापर करावा. म्हणजेच मुलांच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार तयार करावे.
नियम व अटी यांचे प्रमाण या अधिकृत शैलीमध्ये कमी असते. आत्मविश्वास वाढविणारे वर्तन असते, असते, जबाबदार्या कशा सांभाळाव्यात हे देखील समजते, अडचणींवर मात करण्यास शिकतात, स्वतःच्या निर्णयावर ठाम विश्वास असतो. विशेष म्हणजे मुलांकडून चुका जरी झाल्या तरी पालक मुलांना मार्गदर्शन करतात. यातुनच मुले खंबीर, सामाजिकदृष्ट्या जबाबदार , स्वयं नियमित व सहकार्यक्षम असलेली दिसून येतात.
म्हणजेच पालकांनी आपल्या मुलांचे संगोपन करीत असताना सकारात्मक विचारांमुळे मुलांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा हा पालकांच्या सकारात्मकतेचा असतो. जेवढे पालक सकारात्मक असतील तेवढ्या मुलांच्या जीवनातील अडचणी कमी असतात. मुलांचे व पालकांचे संबंध अधिक आनंदायक असलेले आपणास दिसून येतात. त्यामुळे घरामध्ये क्लेश व कलह नसतातच.अशा पालकांची मुले जीवनात यशस्वी लवकर होतात. त्यांना कुठल्याही अडचणी येत नाही आणि ते स्वताःच्या आयुष्यात व समाजामध्ये देखील खूप यशस्वी व आनंददायी पध्दतीने आयुष्य जगताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय तर “सकारात्मक विचार ही सुखी व समाधानी आयुष्याची किल्ली आहे.”
*सौ. योगिता विष्णू अडसरे/ ढोमसे.