गणपती बरोबर लहानपणी एक छान नाते होते.. आमच्या एकत्र कुटुंबातील वाड्यात गणपतीला खास कोनाडा होता.. वर्षभर त्यात गणपती असे. या वर्षीचा गणपती पुढच्या वर्षी विसर्जन करत.. त्यामुळे गणपतीच्या दिवसात दोन गणपती असतं एक नवा आणि एक जुना. कधी घरात कोणी गरोदर असेल तर गणपती विसर्जन होत नसे मग तोही गणपती असे.. पुढच्या वर्षी दोन गणपती विसर्जन होत. मोठा हॉल त्यात गणपतीचा कोनाडा एका भिंती मध्ये.. त्या शेजारी शोकेस.. त्याखाली दिवाण..बाजूला टीव्ही..त्या काळात तो फार थोड्या लोकांकडे असे .. भिंतीवर रवि वर्म्याने काढलेली लक्ष्मी सरस्वतीची मोठी चित्रे आणि एक ज्ञानेश्वरांचे.एका भिंतीत गोदरेज कपाट .. म्हणजे अख्खी कपाटं बसतील आत एवढी जाड भिंत. त्याच्या शेजारच्या भिंतीला कोच.. समोर टी पोय. कोच शेजारी आत यायला दरवाजा.कोच वर खिडकी .त्यापलीकडे जीना त्या हॉल कडे येणारा.तिथे पाटी लक्ष्मी सदन म्हणून. खरेच तिथे लक्ष्मीचे सदन होते. कारण त्या हॉल मध्ये आणि घरात आजोबांचा दरारा होता
या हॉलमध्ये गणपतीत दहा दिवस धमाल असे. त्या कोनाड्यात गणपती मागे फोल्ड होणारे विविध रंगी झिरमिळ्यांचे कागदी पंख्याचे चक्र असे. एक छोटा बल्ब कायम चालू असे. पुढे गौरीची पायऱ्या पायऱ्यांची आरास..त्यासाठी वेगवेगळ्या साइज चे डबे वापरलेले.. खूप सारे फराळाचे मांडलेले..लाडू, करंज्या, शेव, चकली,अनारसे, शंकरपाळी, चिवडे, फळे, खेळणी समोर ठेवलेले . आई, दोन काकू आजी कष्ट घेत हे बनवत. खुप आधीपासून तयारी चालू असे. तेही हसत खेळत..
आमचे काम हळदी कुंकुचे आमंत्रण देणे.. तीन घागरीच्या उतरंडीला भारी साडी नेसवून वर महालक्ष्मीचा पितळी मुखवटा बसवत.. बांगड्याचे पुठ्याचे मुंढे हातांच्या जागी त्याला घातलेली चोळी.. या दोन गौरी बसवणे फार स्कील चे काम..कारण मुखवटे नीट बसले पाहिजे. एकसारखे सजवले पाहिजे.त्यांना डोक्यावर पदर द्यायचा ..कंबर पट्टा, मेखला, पाटल्या, बांगड्या आणि खूप सारे खरे दागिने आई काकुंचे घातलेले. त्यावर हार केसांवर जाळी दांडा आणि गौरी जेवण दिवशी कणकेचे दिवे दोघी लक्ष्मीच्या डोक्यावर.. समोर तांब्यावर कुंची घातलेली दोन बाळे..
गौरी जेवणाला पाच भाज्या, पाच पक्वान्न, पाच कोशिंबिरीचा स्वयंपाक या सुगरणी नैवाद्याला बनवायच्या. घरात १० मोठे आणि आम्ही ६ छोटे , आला गेला वेगळाच .. त्या आधीची साफ सफाई वेगळीच.. इतके सगळे करून संध्यकाळी नटून थटून रात्री उशिरा पर्यंत हळदी कुंकवाला घरोघरी जाणार..इतकी ऊर्जा..तणावरहित वातावरण..अगदी भांड्याला भांडे सुध्दा न लागता.. गौरी विसर्जन नंतर हे सगळे दागिने आम्ही छोटया गौरी घालून मिरवायचो..
त्यानंतरचे दिवस गणपती बघायला जाण्याचे ..रोज दोन पेठा.. रात्री उशिरा पर्यंत बिनघोर भटकायचो मुली मुली..रस्ते आनंदाने फुलायचे..पैसे फार नसतं.. पण मन भरून जायचे. गणपती विसर्जनाला लक्ष्मी रोड वरच्या एका नातेवाईका कडे गणपती बघायला जायचो..त्यांच्या गॅलरी मध्ये त्यांची नी आमची इतकी माणसे.. त्यांच्या दोन खोल्यात आम्हाला आनंदाने सामावून घेत ते..दगडू शेठ गेला की आम्ही घरी..
मग त्या वर्षीचा गणपति वर्षभर आम्हाला साथ देत कोनाड्यात राहत असे..आम्ही बाल गोपाळ आजी जवळ झोपत असू ..त्या कोनाड्यात गणपतीचा छोटा बल्ब चालू असे ..त्या बाल वयात बाप्पाशी किती वेळा मी मनातले बोलत असे.. आजी बरोबर प्रवचन कीर्तनाला जात असे..त्यावेळी कधी कथेकरी बुवा नरकाचे वर्णन रंगवून सांगत असे.. तिथले तळणे, भाजणे, रोरव नरक ..रात्री लहान वयात भीती वाटत असे..झोप लागत नसे..त्यावेळी गणपतीची साथ आधार देई.. अजूनही जेव्हा खूप काही दाटून येतो.. तेव्हा त्यावेळी मनात बसलेला बाप्पाच आधार देतो..कारण आता तो आतच आहे.. बाहेरचा माणसांमध्ये हरवला आहे.. आणि तो बालआनंदही आजी बरोबर हरवला आहे.
डॉ सुनीता बागवडे