दीपावलीच्या आगमनाची पूर्वसूचना देणारा धनत्रयोदशीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो. मृत्यूची देवता मानले जाणारे यमराज आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते. धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवसाशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात. या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले असे मानले जात असल्याने धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणूनही जाहीर करण्यात आला आहे.
दिव्यांची ओळ म्हणजे दीपावली. ज्या सणाला लोक दिव्यांची माळ उजळवतात तो सण म्हणजे दीपावली. रस्तोरस्ती दिव्यांच्या या रांगा आपल्याला दिवाळीत पाहायला मिळतात. उजळविलेल्या दिव्यांमुळे दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखला जातो. संस्कृतमध्ये ज्याला ‘दीपावली’ म्हटले गेले त्यालाच लोकभाषेत ‘दिवाळी’ म्हटले गेले आहे. या दिवशी संध्याकाळ होताच घराघरात दिवे उजळविले जातात. लक्ष्मीला घरात येण्यात अडथळा वाटू नये म्हणून हे दिवे उजळविले जातात. लक्ष्मी ही धनधान्य, सोनेचांदी, पैसा, संपत्ती आणि भौतिक संपदेची देवता आहे. धनधान्य आणि संपत्तीला आवाहन करण्यासाठी इतका झगमगाट करणारा असा वार्षिक उत्सव भारताव्यतिरिक्त अन्य देशांत क्वचितच साजरा केला जात असावा. दिवे उजळवून लक्ष्मीची पूजाअर्चा करणे, आपल्या हिशोबाच्या वह्या आणि तिजोर्यांवर स्वस्तिकाचे चिन्ह उमटवून ‘श्री लक्ष्मै नमो नमः’ किंवा ‘श्री लक्ष्मी जी सदा सहाय’ किंवा ‘शुभ लाभ’ असे लिहिणे, अशा दिवाळीच्या प्रथा आहेत.
‘आरोग्यम् धनसंपदा’ असा मंत्र देणार्या भारतीय संस्कृतीत आरोग्याचे स्थान धनापेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहे. ‘पहला सुख निरोगी काया, दूजा सुख घर में माया’ ही म्हण आजही प्रचलित आहे. त्यामुळेच दीपावली या वर्षातील सर्वांत मोठ्या सणात धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले असून, दीपावलीच्या आगमनाची पूर्वसूचनाच धनत्रयोदशीमुळे मिळते. उत्सवाची सुरुवात धन्वंतरी या आरोग्याच्या देवतेची पूजा करणे हे भारतीय संस्कृतीला अनुसरूनच आहे. पुराणकथांमधील संदर्भांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देव आपल्या हाती अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे विष्णूचे अंशावतार आहेत असे मानण्यात येते. जगात आरोग्यशास्त्राचा विस्तार आणि प्रसार करण्यासाठी साक्षात् विष्णूच धन्वंतरीच्या अवतारात प्रकट झाले होते, अशी शास्त्रमान्यता आहे. धन्वंतरीच्या प्रकटदिनाचे औचित्य साधूनच धनत्रयोदशी साजरी केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी किंवा अन्य धातू आपापल्या कुवतीनुसार खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी घरातील देव्हार्यात दिवा उजळला जातो. तसेच मृत्यूची देवता मानल्या गेलेल्या यमराजांसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्यात येतो. हिंदीत ‘धनतेरस’ नावाने साजरी करण्यात येणारी धनत्रयोदशी हा हिंदूंचा एक पवित्र सण आहे. धन्वंतरी देवतेच्या प्रकटदिन हाच असल्यामुळे या सणाला अधिक महत्त्व आहे. धन्वंतरी देव हा आयुर्वेदाचा जनक मानला जातो. पृथ्वीवर आयुर्वेदाच्या प्रसारासाठीच विष्णूने धन्वंतरीचे रूप घेतले अशी मान्यता आहे. चार हात असलेले धन्वंतरी देव समुद्रमंथनातून प्रकट झाले. सागरातून अवतरित होताना धन्वंतरीच्या एका हातात औषधी आणि दुसर्या हातात अमृतकुंभ होता. अन्य दोन हातांमध्ये विष्णूप्रमाणेच शंख आणि चक्र होते. समुद्रमंथनाच्या वेळी शरद पौर्णिमेला चंद्र, कार्तिक द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी, चतुर्दशीला काली माता आणि अमावस्येला लक्ष्मीदेवता प्रकट झाली, असे मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी घराची व्यवस्थित साङ्गसङ्गाई करून सायंकाळी दिवे उजळवून लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी ही सुख, समृद्धी आणि वैभवाची देवता आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मी प्रकट होऊन एका गरीब, दुःखी शेतकर्याला अक्षय्य संपत्तीचे वरदान दिले होते, असे मानले जाते. त्यामुळेच धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या यांच्याबरोबरच धनसंपत्तीची देवता असलेल्या कुबेराची पूजाही धनत्रयोदशीला अनेक घरांमधून केली जाते. या दिवशी कुबेर देवाची विधीवत पूजा केली असता, तो प्रसन्न होऊन आजन्म धनसंपत्तीचा आशीर्वाद देतो, अशी धारणा आहे.
कुबेराला प्रसन्न करण्यासाठी त्याचे चित्र किंवा कुबेर यंत्रासमोर दिवा उजळविणे किंवा कुबेर मंत्राचा जप करणे पुरेसे मानले जाते. धनप्राप्तीसाठी कुबेराची पूजा केवळ धनत्रयोदशीलाच नव्हे तर दररोज केली जाऊ शकते. अनेक लोक धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत लक्ष्मीसोबत कुबेराची भक्तिभावाने पूजा करतात. धनत्रयोदशीचा दिवस यमराजालाही समर्पित आहे. या दिवशी संध्याकाळी यमाला दीपदान केले जाते. यमाची पूजा, आराधना करण्याचा संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस आहे. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. धनत्रयोदशीला दक्षिण दिशेला दिवा लावल्यास त्या घरात कुणाचाही अकाली मृत्यू होत नाही, अशी धारणा आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीगणेश आणि लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी गणेश-लक्ष्मीची मूर्ती खरेदी केल्यामुळे वर्षभर घरात धनसंपत्तीचे आगमन होत राहते, असे मानतात. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने तसेच चांदीची भांडी खरेदी करणेही शुभ मानले जाते. ज्यांना चांदीची भांडी खरेदी करणे शक्य नाही, ते इतर धातूंची भांडीही खरेदी करू शकतात. पितळ हा धन्वंतरीचा आवडता धातू असल्यामुळे या दिवशी पितळेची भांडीही खरेदी केली जातात. असे केल्यास धन्वंतरी प्रसन्न होतो, अशी धारणा आहे.
धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले, तेव्हा त्यांच्या हातात अमृतकुंभ होता. हे एक प्रकारचे भांडेच असल्यामुळेही धनत्रयोदशीला भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. भांड्यांबरोबरच या दिवशी धातूच्या अन्य वस्तू खरेदी करणेही शुभ मानतात. काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने भगवान धन्वंतरीच्या जयंतीचा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे आयुर्वेद शिक्षणसंस्थांमध्ये या दिवशी धन्वंतरी जयंतीला म्हणजेच धनत्रयोदशीला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आयुर्वेदाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे गुरुजन जगात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणार्या धन्वंतरीची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. त्यामुळेच भारत सरकारने धनत्रयोदशी हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
– सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक