दंभ म्हणजे ज्याला आपण ढोंगीपणा किंवा इंग्रजीत हायपॉक्रिसी म्हणतो तो अवगुण. भगवद्गीतेत दंभ अंगी असणं हे कशाचं लक्षण आहे ते सांगितलं आहे.
दम्भो दर्पो। भिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् ।्।
म्हणजे ढोंग, घमेंड, (वृथा) अभिमान, क्रोध, अज्ञान आणि कठोरता ही केवळ रानटी किंवा असंस्कृत (असुर) लोकांचे गुणधर्म आहेत.
समाजामध्ये आपल्याला खूप ढोंगी माणसं दिसून येतात. अगदी आपल्या जवळच्या माणसांत सुद्धा! एखाद्या समारंभात (खोटे) दागिने घालून तोऱ्यात मिरवत जाणारी स्त्री ही ढोंगीच असते. आपला पगार (विचारलेला नसतानाही) जो गृहस्थ सांगत असेल तो खचितच बराच वाढवून सांगत असतो.
हे केवळ बडेजाव दाखवण्यासाठीच असतं. कुठलाही दिखाऊपणा हा दांभिकताच दर्शवीत असतो. आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ढोंगच. मी शाळेत असताना माझा एक मित्र प्रत्येक विषयातले गुण मला विचारीत असे. मी ते सांगितल्यावर आणि त्याला त्याचे विचारल्यावर तो वाढीव आकडा सांगत असे. कोणत्याही निकालानंतर असंच घडत असल्यानंतर शंका आली आणि एके दिवशी त्याचं प्रगतिपुस्तक हाती आलं आणि त्याचा दांभिकपणा उघडकीला आला.
एका ओळखीच्या व्यक्तीला प्रत्येक भेटीच्या वेळेला त्याच्या मुलाचं अमेरिकेतील ऐश्वर्य व्यक्त करण्याची सवय होती. ते जरी खरं असलं तरी त्याचा बडेजाव माझ्या आणि इतर (त्यांच्या दृष्टीनं) सामान्य स्थितीतील लोकांना सांगणं हा शेवटी पोकळ डौलच नव्हे का? शेवटी अमेरिकेत स्थायिक झालेले बहुतांश भारतीय अतिशय सुस्थितीत आहेत असं मला सांगावं लागलं तेव्हा त्याचा दंभ काहीसा कमी झाला.
राजकीय नेते, सेलेब्रिटी यांचा दंभ तर अगदी डोळ्यात खुपण्यासारखा असतो. मी असं केलं आणि तसं केलं असा पोकळ डौल दाखवणारे अनेक नेते दिसून येतील. काही अभिनेते किंवा अभिनेत्री मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर बोलणी चालू आहेत, हॉलिवुडमधून कामासाठी विचारणा झाली आहे अशा बाता मारताना दिसून येतात.
बऱ्याच काळानंतर काहीच झालं नाही की मग तारखा जुळत नाहीत, बोलणी फिसकटली असं त्यांना सांगावं लागतं. काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञद्वयीनं आपण परीक्षानळीमध्ये परमाणुविभाजन करण्यात यश मिळवलं आहे असा दावा केला होता. विख्यात प्रयोगशाळांनी हा दावा खोटा आहे असं सिद्ध केल्यावर त्या शास्त्रज्ञांना मूग गिळून गप्प बसावं लागलं. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी या ढोंगाचा आधार घेतला होता. रामार पिल्ले नामक एका माणसानं वनस्पतिज (हर्बल) पेट्रोल निर्माण केल्याचा आणि ते खूप स्वस्त असल्याची घोषणा केली होती. तीही एक स्टंटबाजी असल्याचं पुढे निष्पन्न झालं.
दंभाचं मूळ हे ईर्षा, हेवा हेच आहे. जे आपल्याकडे नाही ते कसंतरी करून आहे हे दाखवण्याची केविलवाणी धडपड म्हणजे दांभिकता होय. काही वेळा स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी दंभाचा आधार घेतला जातो. पण असा देखावा केवळ अल्पायुषीच असतो. समाजात अशा खोट्या कल्पना काही काळ शिजू शकतात-पण पुढे-मागे त्यातील फोलपणा लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
अनेक भामटे आणि लफंगे पैसे दुप्पट करून देतो, स्वस्तात सोनं देतो, तुमच्यासाठी परदेशातून भेटवस्तू आणली आहे मात्र ती सोडवण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे असं सांगून फसवणूक करीत असतात. अशांचं ढोंग सातत्यानं उघडकीला आणलं पाहिजे. मी वर म्हटलं आहे की अशी ढोंगं फार काळ टिकू शकत नाहीत पण या फसवणुकीच्या घटना इतक्या वारंवार घडत आहेत की समाज या घटनांतून काही बोध घेत आहे की नाही अशी शंका येते.
सद्हेतूनं केलेलं सोंग मात्र कौतुकाला पात्र आहे. गुप्तहेरांना देशकार्यासाठी सोंगं घ्यावीच लागतात. काही लोकांना आपल्या प्राणांचं रक्षण करण्याकरता मेल्याचं सोंग घ्यावं लागतं. पॉसम नावाचा प्राणी हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्याकरता अशाच तंत्राचा वापर करतो. ही ढोंगं, सोंगं म्हणजे नक्कीच दंभ नव्हे.
आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून दंभाला टाळणे हेच चांगल्या वागणुकीचं लक्षण आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी