लोकसंस्कृतीचं आणि दिवाळीचं नातं अतूट आहे. म्हणूनच अनेक जानपदगीतांतील दिवाळी हरखून टाकणारी असते. आंब्याचे टाळे, झेंडूच्या ङ्गुलांच्या माळा, गेरूने आणि चुन्याने सजवलेले कोनाडे, त्यातले दिवे, गावच्या अंधाराच्या कुशीतील पणत्यांच्या रूपाने सुरू झालेली तेजाची पूजा म्हणजे दिवाळी! जानपदगीतांतील स्त्रीचा संवाद कधी आपला आपल्याशी, कधी आपल्या समष्टीशी, कधी आपल्या कुटुंबाशी, तर कधी निसर्गाशी असतो. बहिणाबाईंनी याच संवादाला ‘हिरीताचं देणं घेणं’असं म्हटलं आहे. दिवाळीत हे ‘हिरीताचं देणं घेणं’ करंजीसारखं गोड आणि चिवड्यासारखं खुमासदार वाटतं.
संत, पंत आणि तंत यांनी महाराष्ट्राचा लोकधर्म घडविला. पिढ्यान् पिढ्यांचे संस्कार मुखर झाले ते संत साहित्यातून, पंत साहित्यातून आणि तंत साहित्य म्हणजे शाहिरांकडून. या तीनही संस्थांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील अनेक गोष्टी टीपकागदाने शाई टिपावी तशा टिपून घेतल्या. इतकंच नव्हे तर त्याला जानपद साहित्याचं सुवर्णकोंदण दिलं. दिवाळीसारखा सणही या संत, पंत आणि तंत परंपरेनं प्रेमाने जपून ठेवला. संत ज्ञानेश्वरांनी दिवाळीचं वर्णन करताना ‘ज्ञानेश्वरीत’ म्हटलं आहे-
‘सूर्ये अधिष्ठिली प्राचीश्र
जगा राणीव दे प्रकाशाची।
तैसी वाचा श्र्ोतया ज्ञानाची।
दिवाळी करी॥
संत तुकाराम महाराजांनी देखील ‘साधुसंत घरी येणे म्हणजेच दिवाळी आहे’ असं म्हटलं आहे-
‘दसरा दिवाळी तोची आम्हा सण।
सखे संतजन भेटतील॥
अमूप जोडील्या सुखाचिया राशी।
पार या भाग्यासी नाही आता॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा।
पिकली हे वाचा रामनामी॥
तुका म्हणे काय होऊ उतराई।
जीव ठेवू पायी संतांचिया॥
दिवाळीचं महत्त्व संतांनी अशा पद्धतीने अधोरेखित केलं असतानाच लोकसंस्कृतीतील लोकवाङ्मयानेदेखील ते पिढ्यान् पिढ्या जपून त्याचं संवर्धन केलं ते जात्यावरच्या ओव्यांच्या रूपाने, अथवा दिवाळीत साजर्या होणार्या विविध गीतांच्या माध्यमातून. खरं म्हणजे दिवाळी हा सृजनाचा सण. कृषी संस्कृतीत हे सृजन धनधान्याच्या रूपाने प्रगट होतं-
‘आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे,
करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे,
नाचतीया पोर सोर बागडती गुरढोर
मोत्याची रास आली खळ्यावरी रे’
दसर्याच्या सुमारासच मोत्याच्या राशी खळ्यावर यायला सुरुवात होते. दसरा म्हणजे जणू दिवाळीचा पूर्वरंग. दसर्यालाच झेंडूच्या ङ्गुलांच्या माळांनी घर सजतं. खुरासणीच्या ङ्गुलांनी घटस्थापनेत माळा चढविला जातात. आदिमायेची पूजा प्रथम दसर्याला सुरू होते आणि या पूजेचा संस्कार पुढे दिवाळीतही सुरू राहतो. भगवान शंकराची पार्वती. तिची आदिमाया, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, अन्नपूर्णा, जगदंबा, दशभूजा, सिंहवाहिनी, काली, मुक्तेश्वरी, जगत्गौरी, तारा, छिन्न मस्तका, गणेश नंदिनी अशा विविध रूपात पूजा बांधली जाते. दसर्यापासून हा शक्ती देवतेचा उत्सव सुरू होतो आणि तो सृजनाचं सर्व वैभव घेऊन येतो.
घरोघर मातीचे घट, मातीचे दिवे, शेतातून उगवलेलं धान्य, त्याची घटाभोवती पखरण, खुरासणीच्या पिवळ्या ङ्गुलांनी सजलेला घट, गव्हाच्या लोंब्या आणि अहोरात्र तेवणारे अखंड दिवे. ही दिव्यांची आरास दिवाळी आली की उत्तरोत्तर अधिक रंगत जाते. दिवाळी शक्तिदेवतेची, पंचमहाभूतांची, बळीराजाची, यमदेवाची. दसर्याचा उत्साह पुढे आश्विनी शुद्ध पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या कलेप्रमाणे वर्धिष्णू होतो. कोजागिरीला लक्ष्मीची पूजा करून तिला आवतन द्यायचं आणि रात्री तिच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं. दिवाळी केवळ माणसांचीच नाही तर गाईगुरांचीही. गाईगुरांना चोळूनमोळून आंघोळ घालायची, त्यांना ओवाळायचं आणि त्यांच्या मुखी पुरणपोळीचा घास घालायचा. टिपर्या-काठ्यांच्या नादात गाईगुरांची रंगभोगाची पूजा मांडलेली असायची. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा तेजाचा सोहळा लोकसंस्कृतीत सुरू असतो. कसा तर…
‘दिन दिन दिवाळी गायी म्हशी ववाळी
गायी म्हशी चौवर शिंग भाई नव्वर
नव्वर कुणाचा लक्षीमणाचा
चवळण मवळण केली गुंजा
हरकीच्या काठीला खुळखुळ गुंजा’
शेणानं सारवलेल्या स्वच्छ अंगणासमोर तुळसीवृंदावनाभोवती वेलबुट्ट्यांची रांगोळी काढलेली. पहाटे पहाटे वासुदेवाच्या टाळ-चिपळ्यांच्या सुमधुर नादात आणि ‘दान पावलं, दान पावलं’ अशा घोशात आम्हा मुलांना जाग येई. आणि पहाटेच तोंड न धुता डोळे चोळीत ङ्गुलबाज्यांच्या कांड्या हाती घेऊन आमची ‘दिन दिन दिवाळी’ सुरू व्हायची. खरं म्हणजे ‘दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी’ हे जानपदगीत देवदिवाळीसाठी असावं. पण देवदिवाळी आधीच आमचा हा घोशा सुरू असायचा.
लोकसंस्कृतीचं आणि दिवाळीचं नातं अतूट आहे. म्हणूनच अनेक जानपदगीतांतील दिवाळी हरखून टाकणारी असते. आंब्याचे टाळे, झेंडूच्या ङ्गुलांच्या माळा, गेरूने आणि चुन्याने सजवलेले कोनाडे, त्यातले दिवे, गावच्या अंधाराच्या कुशीतील पणत्यांच्या रूपाने सुरू झालेली तेजाची पूजा म्हणजे दिवाळी!
दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र असे धार्मिक महत्त्व आहे. हे महत्त्व कळण्याचं ते वय नव्हतं. आजही अनेकांना दिवाळीमागचे सर्व धार्मिक संदर्भ ज्ञात असतीलच असे नाही, पण दिवाळी हा ज्योतीने तेजाची आरती ओवाळावी असा तेजाचा आरतीचा उत्सव आहे.
पंचमहाभूतांची म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची पूजा दिवाळीत विविध प्रतीकांच्याद्वारे केली जाते. दिवाळी तसा सृजनाचा उत्सव असतो. कारण मोत्याचं पीक खळ्यावर आलेलं असतं. अशा या तेजाच्या आणि सृजनाच्या उत्सवाच्या विविध परी लोकसंस्कृतीत पाहायला मिळतात. दिवाळीच्या वेळी नातेसंबंधातील विविध रंगीबेरंगी गोङ्ग विविध ओव्यांमधून गुंङ्गले जातात.
पाडवा आणि भाऊबीज या संदर्भात अनेक जानपदगीतं आजही ग्रामीण स्त्रियांच्या ओठी असतात. भावाशी लाडाने आणि लटक्या रागाने बोलणारी बहीण दिवाळीच्या निमित्ताने त्याला बजावते,
‘दिवाळीच्या दिशी तुझं दिवाळं काढीन
गायी खुट्याची सोडीन, चोळी अंजिरी ङ्गाडीन’
इतकी का बरं भावावर रागावली आहे त्याची बहीण? कारण तो तिला माहेरी न्यायला लवकर आलेला नाही. एका बाजूला ‘बघतेच तुला’ असे म्हणून भावाच्या खुट्याची गाय सोडू पाहणारी बहीण, दुसरीकडे मात्र ‘आपला कामाचा पसारा वाढलेला आहे, जरा उशिराच न्यायला ये’ असे सांगते,-
‘दिवाळी-दसरा माझ्या कामाचा पसरा
सांगते बंधू माझ्या मूळ धाडावा उशिरा’
‘मूळ’ म्हणजे ‘मुर्हाळी’. मुर्हाळी उशिरा पाठव असे ती भावाला सांगते. या मुर्हाळीला चार युक्तीच्या गोश्टी सांगायलाही बहीण मागेपुढे पाहात नाही,
‘मुर्हाळ्या माझ्या दादा, घोडं बांधावं जाईला
सोयर्याला रामराम, मग भेटावं बाईला’
बहिणीकडे आलेलं हे शहाणपण ‘कॉलेज ऑङ्ग कॉमनसेन्स’मधून आलेलं असतं. दिवाळीच्या निमित्ताने जानपदगीतांतून अशा अनेक बहिणी मुखर होतात. दिवाळीच्या ओवीगीतातील शब्द प्रत्यक्ष चालते-बोलते आहेत. म्हणजे उच्चाराने बोलते व अर्थाने चालते. कोशातील शब्द मृत असू शकतात. पण बोलीभाषेतील शब्द जिवंत असतात. ओवीगीतांची भाषा उच्चारात व प्रयोगात लवचीक असते. ती व्याकरणाचे बंधन झुगारून आपल्या आंतरिक उर्मीने शब्दांच्या उच्चारांच्या व अर्थाच्या क्षेत्रात अधिक मोकळीक घेऊन म्हणजेच भाषेतील शब्दांना आपल्या मनासारखे वाकवून त्यांच्या द्वारे मनातील भावना व्यक्त करते.
अशा जिवंत व चैतन्यपूर्ण शब्दांच्या द्वारे व्यक्त झालेल्या प्रतिमांनी ओवीगीतांची सृष्टी नटलेली आहे. लोकजीवनाचा आविष्कार करणारी ही ओवीगीतांतील प्रतिमासृष्टी आकर्षक, नयनरम्य व अर्थपूर्ण आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेङ्गाटा गावच्या पुष्पलता डोके या महिलेला अशी अनेक जानपद गीते तोंडपाठ आहेत. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे डोकेबाईंचे गुरू असून आळंदी-पंढरीच्या वारीत डोकेबाई अशा अनेक ओव्या आणि जानपद गीते गात असतात.
‘पाव्हणा मला आला भाजी असा भाकरीचा
सांगते बाई माझ्या सखा आला अंजरीचा’
भाजीभाकरीच्या पाव्हन्याचं कौतुक बहिणीला असतं. ‘दिन दिन दिवाळी’ या गाण्याची अनेक रूपं लोकसाहित्यात पाहायला मिळतात. त्यातलं एक रूप असं-
‘दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ववाळी
गाई कुणाच्या
लकषुमणाच्या
नरशा आला पिवून गेला
खंडोबाच्या आड लपला
खंडोबाचं तोंड तुटलं
त्याच्या मागं घोडं सुटलं
घोड्याला होती लगाम दोरी
कान्ह्या भिल्ल हाती धरी
काळा कुट्ट कान्ह्या भिल्ल
त्याच्या कमरेला सात तीळ
एक तीळ उपसिला
बगलेला भारून हल्ला केला
समोर गावचा पाटील दिसला
पाटील बघून सलाम केला’
तुळस, दिवे, रांगोळ्या, तसंच भाऊबीज आणि पाडव्यासंबंधीची अनेक वर्णनं आपणास जानपद वाययात पाहायला मिळतात.
‘तुळस वंदावी वंदावी
माऊली संताघरी साऊली
तुळस वंदावी
तुळस घालीत ऐसी वटा
विघ्न पळती बारा वाटा
तुळसी घालीत ऐसे पाणी
होईल पातकाची धुणी
तुळस वंदावी’
तुळशीचं महिमान नेमक्या दिवाळीच्या वेळी गाण्याचं कारण दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाचा माहोल सुरू होतो. ज्ञानेश्वरांनी वासुदेवाच्या तोंडी असणार्या ओव्या सांगितल्या आहेत. त्या अशा-
‘घुणघुणा वाजती टाळ। झणझणा नाद रसाळ ।
टाळटाळी लोपला नाद। अंगोअंगी मुरला छंद।
भोग भोगिताची आटला भोग।
ज्ञान गिळोनि गावा गोविंद।
गवा आता बाहर हिंडे आळी ।
देवोदेवीची केली चिपळी।
चरण नसता बाजे धुमाळी।
ज्ञानदेवाची कांती सावळी।’
असा हा ज्ञानदेवांचा वासुदेव. तर दिवाळीच्या दरम्यान पहाटे तुळशीभोवती ङ्गेर्या मारणारी स्त्री तुळशीशी संवाद साधते तो असा-
‘अग अग तुळशीबाळ तुला अमृताचे आळे
रामाने लावली, लक्ष्मणाने आणली
सीताबाईने प्रतिपाळ केला
तुळशी आई माझा नमस्कार तुला
शंभो शिवहरा करीन तुझी सेवा
मोत्याची राशी बारसी दिवशी
हातात बेलाचे पान
मला लागलं शिवाचे ध्यान
अग अग तुळशी मी एक आळशी
तुला घालीन पाण्याची कळशी
तू म्हणशील केव्हा केव्हा
तर मला बनेल तेव्हा
साठ होवू दे पित्राची
पावे जाऊं दे जन्माची’
दिवाळीत तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. दिवाळीच्या दरम्यान केवळ गावात नव्हे, तर मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधूनदेखील रंगावली प्रदर्शने आयोजित केली जातात. गावाकडे रंगावली दर्शन असतं, तर शहरात प्रदर्शन असतं. चुनखडीच्या शुभ्र चुणीने, त्याच प्रमाणे विविध रंगांचं साहाय्य घेऊन सारवलेल्या जमिनी व वेलपत्ती, स्वस्तिक, अष्टदल इत्यादी प्रतीकं, पदचिन्हं, चंद्र, सूर्य, सर्वती-भद्रादी मंडलं, विविध कोनात्मक आकृत्या इत्यादी काढतात. त्याला रंगावली म्हणतात. याच रंगावलीला बंगालमध्ये ‘अल्पना’, बिहारमध्ये ‘अलिपन’, राजस्थानात ‘मांडवा’ उत्तरप्रदेशात ‘चौकापूर्ण/सोतारेख, ‘कजली’, गुजरातमध्ये ‘साथिया-साथियो, कर्नाटक- महाराष्ट्रात ‘रांगोळी’, ‘आंध्रप्रदेशात ‘मुग्गू’, तमिळनाडूमध्ये ‘कोलम’ असं म्हणतात. तर केरळी लोकांनी हिचं ‘पूविडल’ असं नामाभिधान केलं आहे.
धर्मशास्त्राच्या इतिहासात ‘तांदळाच्या जाड्याभरडया पिठाने किंवा पांढर्या दगडी चुणीने (शिरगोळा) विविध आकृत्या रेखाटने, अशी रांगोळीची व्याख्या दिली आहे.
‘कुमारीपूजामन्त्रकथनम्’मध्ये नवरात्र संमारंभात कुमारिकांची पूजा करताना निरनिराळया जातीच्या कुमारिकांना लावावयाच्या तिलकांची व त्यांना बसावयास द्यावयाच्या आसनांची माहिती आलेली आहे. ही आसने तांदळाच्या पिठाने चितारली जात असत. त्याचे पुढील प्रकार असत. 1) अष्टपद, 2) षडश्र्, 3) त्रिकोण, 4) चतुरस्र, 5) स्वस्तिकांक. बंगालमध्ये वधूवरांच्या लाकडी आसनावर, तसंच पाहुण्यांच्या आसनावरही अल्पना काढण्याचा प्रघात आहे. रांगोळीची विविध प्रतीकं ही भारतीय लोकसंस्कृतीची प्रसादचिन्हं आहेत. रांगोळीची अशी विविध रूपं लोकसंस्कृतीत चितारलेली दिसतात. दिवाळीच्या वेळी ही रूपं आपल्याला प्रकर्षाने जाणवतात.
हल्ली नागर संस्कृतीत ‘दिवाळी पहाट’ आली आहे. लोकसंस्कृतीत दिवाळी पहाट म्हणजे मंदिरातल्या काकड आरतीपासून सुरू झालेला टाळा मृदंगाचा गजर. राम प्रहरात हा गजर सुरू झालेला असायचा. आजही कार्तिकी एकादशी पूर्वी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा गजर सुरू असतो. दिवाळीत किल्ले करण्याची संकल्पना शिवकालापासून सुरू झालेली असावी. दिवाळीत गुराख्यांची गाणी देखील रंगत असायची. त्यात प्रश्नोत्तरं असायची ती अशी-
‘वाकडी तिकडी बाभळ
त्याच्यावर बसला होला
इकडून तिला टोला
बेदरला गेला
बेदराचं घुंगरू सोळा बैल नांगरू
सोळा बैलाची वेसन
निळ्या घोडीवर बसणं
निळ्या घोडीचा खरारा
वाघ मारी भरार्या
वाघाला मोडला काटा रे ग्यानवा
गाई लागल्या वाटारे ग्यानबा
लोकसंस्कृतीतील जानपदगीतात दिवाळी अशी ठायी ठायी दिसते. कारण या जानपदगीतांतील स्त्रीचा संवाद कधी आपला आपल्याशी, कधी आपल्या समष्टीशी, कधी आपल्या कुटुंबाशी, तर कधी निसर्गाशी असतो. बहिणाबाईंनी याच संवादाला ‘हिरीताचं देणं घेणं’असं म्हटलं आहे. दिवाळीत हे ‘हिरीताचं देणं घेणं’ करंजीसारखं गोड आणि चिवड्यासारखं खुमासदार वाटतं.
-प्रा. डॉ. प्रकाश खांडगे,
लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक