रूपगंध : सोव्हियत काळातील पोस्टर्सची जादू

कालकृत्यांचा वापर करण्यात सोव्हिएत सरकारची कामगिरी लक्षवेधी होती. यामुळे लोकसंख्येच्या विचारसरणीवर नियंत्रण ठेवून सोव्हिएत विचारांचा प्रसार करण्यास मदत झाली. हिटलर आणि पुढील काळात अमेरिकेविरोधी वातावरण तयार करता आले. दुर्दैवाने, सोव्हिएत कोसळल्यावर बरीच पोस्टर्स फाडली गेली, नष्ट करण्यात आली.
खोसला का घोसला या चित्रपटात कमल किशोर खोसला (अनुपम खेर) यांच्या जमिनीचा खुराना (बोमन इराणी) अवैधपणे ताबा घेतो. चित्रपटातील एका दृश्यात, खोसला आणि त्याचा मुलगा बंटी (रणवीर शोरी) खुरानाची भेट घ्यायला त्याच्या कार्यालयात जातात. खुरानाच्या कॅबिनमध्ये टेबलच्या मागील भिंतीवर एक वाघ अस्वलावर हल्ला करतानाचे चित्र असते. हे चित्र खुरानाच्या स्वभावाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे, तसेच खोसला आणि बंटी यांना खुरानापासून असलेला धोका पटवून देण्यात प्रभावी ठरते. अशा प्रकारे, भिंतींवर असलेल्या चित्रांचा वापर लोकांना संदेश देण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे.
कलाकृत्या अनेक भावना व्यक्त करण्याचे एक शक्तिशाली साधन आहेत. योग्यरित्या वापर केल्यास अशी चित्रे लोकांच्या मनात भय किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात हे सोव्हिएत काळातच सिद्ध झालेले आहे. तेव्हा पेंटिंगपासून बनविलेली पोस्टर्स सोव्हिएत विचारसरणी व देशभक्तीचा संदेश पसरवण्याकरिता होत असे. विरोधी विचार असलेल्या लोकांना धमकाविण्यासाठी देखील याचा वापर केला जायचा. सोव्हिएत पोस्टर्समध्ये प्रभावी दृश्य, उत्कृष्ट चित्रकला तसेच सोप्या भाषेचा वापर असल्यामुळे त्यातील विषय लोकांच्या मनात घर करून राहायचा.
पोस्टर्सची लिलावात मागणी
सोव्हिएत देशांमध्ये पोस्टर्सचा हा ट्रेंड 1917 मध्ये सुरू झाला. सर्वात प्रथम तयार केलेल्या पोस्टर्समध्ये कामगारांची सकारात्मक प्रतिमा आणि त्यांना नवीन उज्ज्वल भविष्याची आशा दाखविण्यात आली. सोव्हिएत काळात पोस्टरच्या माध्यमातून लोकांमध्ये जर्मन आक्रमणकारी सैन्याविरुद्ध लढण्याची भावना देखील निर्माण करण्यात आली. याच काळात निरक्षरता, भांडवलशाही आणि आळशीपणावर टीका करणारे पोस्टर्स चर्चेत राहिले. दुसऱ्या महायुद्धात सैन्यभरती, मद्य विरोधी मोहीम आणि नागरिकांना सतर्क राहण्यास प्रोत्साहित करणाऱ्या पोस्टरसाठी अजूनही कला लिलावात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सोव्हिएत काळातील पोस्टर्ससाठी सर्वाधिक कौतुक झाले ते व्हिक्टर गोवोर्कोव, एन. वतोलिन, एन. डेनिसोव्ह, अलेक्झांडर रोडचेंको, दिमित्री मूर, गुस्ताव क्लुटिस, एल् लिस्सित्स्की व्लादिमीर टव्हरडोखलेबोव्ह आणि नाथन अल्टमॅन यांचे. गुस्ताव क्लुटिस यांच्या एका पोस्टर्ससाठी आजदेखील लिलावात लोक 15 हजार डॉलर्स इतकी रक्कम मोजायला तयार दिसतात. अत्यंत आकर्षक वाटणाऱ्या या पोस्टर्सची उल्लेखनीय बाब म्हणजे यांचे डोळ्यांना भिडणारे, स्वयं-स्पष्टीकरणात्मक डिझाइन. कमीत कमी शब्द वापरून संदेश देणारी चित्रे सर्वोत्तम. लोक दुरूनच पोस्टर पाहून अगदी मजकूर न वाचता देखील त्यातील संदेश समजून जातात. सर्वच डिझाइनमधील ठळक रंग आणि बोल्ड अक्षरात लिहिलेल्या घोषणांमुळे ती पसंत केली जातात.
यूएसएसआर कलाकार संघाची भूमिका
सोव्हिएत काळात आपल्या कलेमुळे कायम चर्चेत राहणारे व्लादिमीर टव्हरडोखलेबोव्ह (85) यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. चर्चेदरम्यान त्यांनी सोव्हिएत प्रोपगंडा पोस्टर्स निर्मितीबाबत माहिती दिली. व्लादिमीर यांच्या चित्रांची पोस्टर्स गावखेड्यातील शाळा, बालवाडी, ऑफिस, तसेच वैद्यकीय सुविधा केंद्रात लावण्यात आली होती. यूएसएसआर कलाकार संघाची (आर्टिस्ट्स युनियन ऑफ द यु.एस.एस.आर) यात महत्त्वाची भूमिका. अनेक चित्रकारांना या संघात सामील होण्याची इच्छा होती. परंतु संघटना चित्रकाराचा एकूण अनुभव, त्याने किंवा तिने प्रदर्शित केलेली चित्रे, तसेच मोठ्या कलाकारांच्या असलेल्या शिफारशी पाहून व्यक्ती निवडायचे. यूएसएसआर कलाकार संघा व्यतिरिक्त चित्रकारांच्या सहकारी संस्थादेखील कार्यरत होत्या. बहुतेक संघटनांना मिळणारे काम हे कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेशी जोडलेले असायचे.
नवीन प्रकल्प आल्यावर प्रत्येक शहरातील सहकारी संस्था त्यांच्या फलकावर याबाबत माहिती लिहायच्या. नमूद केलेल्या आवश्यकतांनुसार, चित्रकार लहान स्वरूपात पेन्सिलने पहिले रेखाचित्र तयार करून सल्लागार मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवायचे. ह्या प्रथम स्केचला मंजुरी मिळाल्यावर चित्राची ए2 किंवा ए3 आकारात प्रतिकृती तयार करून ती अंतिम मंजुरीसाठी जायची. सर्व टप्पे पार झाल्यानंतर डिझाइन पोस्टर छापण्यासाठी पाठवली जायची. या पोस्टर्सचा वापर श्रम उत्पादकता, मातृत्व, लष्करी भरती, आरोग्य, सुरक्षा आणि शेती यासारख्या विविध विषयांबाबत जनजागृती करण्याकरिता केला जायचा. व्लादिमीर टव्हरडोखलेबोव्ह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोग्य आणि सुरक्षा विषयाचे पोस्टर्स कमी दर्जाच्या कागदावर, तर चित्रपट व वैचारिक मुद्द्यांवरील पोस्टर्स करीत उच्च दर्जाच्या कागदाचा वापर व्हायचा.
आजदेखील प्रभावशाली
पोस्टर्स अजूनही पूर्वीसारखे प्रभावशाली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर कदाचित पी. एल. ओ. एस-वन जर्नलने डिसेंबर 2012 दरम्यान प्रसिद्ध केलेल्या सायकल चोरांनो, आम्ही तुम्हाला पाहत आहोत या संशोधन अहवालात मिळेल. अभ्यासाचे प्रमुख लेखक डॅनियल नेटल यांच्या निष्कर्षानुसार, बाइक पार्किंगच्या ठिकाणी चकचकीत डोळ्यांचे पोस्टर लावल्याने सायकलचोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या.
सोशल मीडियाच्या या युगातही अनेक देश उत्कृष्ट, लक्षवेधक, स्मरणीय चित्रकला असलेले पोस्टर रोग आणि पर्यावरणविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता वापरतात. उदाहरणार्थ, आशिया आणि आफ्रिकामधील विकसनशील देशात क्षयरोग, मलेरिया आणि एड्स यांसारख्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर्सचा वापर होतो.
– नित्तेंन गोखले





