रेवांचल एक्सप्रेस या नावाने सध्या ओळखला जात असलेला मध्य प्रदेशचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याला संधीचे सोने करण्याची संधी मिळाली आहे. श्रीलंकेचा यॉर्करकिंग लसित मलिंगा याचा शिष्य असलेल्या कुलदीपला भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संधी मिळाली आहे. तो त्याचे निश्चितच सोने करेल असा विश्वास वाटतो.
एक काळ होता कपिलदेव यांच्यासारख्या महान ठरलेल्या गोलंदाजालाही टोमणे सहन करावे लागले होते. त्यांनी जेव्हा पदार्पण केले तेव्हा प्रत्यक्ष सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात त्यांना नाश्ता म्हणून केवळ दोनच पराठे दिले गेले होते. त्यावेळी त्यांनी जास्तीचे पराठे मागितल्यावर बीसीसीआयच्या एका सदस्याने भारतात वेगवान गोलंदाज बनत नाही व त्यांना सरस कामगिरीही करता येत नाही इथे केवळ फिरकी गोलंदाजांचेच राज्य चालते असे हेटळणीच्या स्वरुपात सांगितले होते. त्यानंतर कपील देव यांनी दंतकथा बनून 1994 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना 434 बळी नोंदवताना इतिहास घडवला होता. तेव्हा हाच सदस्य कपिलदेव यांना तोंडही दाखवू शकला नाही. मात्र, याच कपिल यांचा आदर्श घेत भारतात कित्येक वेगवान गोलंदाज तयार झाले व आजही नवनवे गोलंदाज पुढे येत आहेत.
मनोज प्रभाकरपासून जवागल श्रीनाथपर्यंत, तर जहीर खान, जसप्रीत बुमरा, महंमद शमीपासून आताच्या उमरान मलिक, महंमद सिराज, कुलदीप सेनपर्यंत अनेक वेगवान गोलंदाज देशांतर्गत किंवा आयपीएलच नव्हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवत आहेत. कधी नव्हे ते भारतीय गोलंदाज परदेशी संघांसाठी डोकेदुखी ठरलेले आता चित्र दिसते तेव्हा अभिमान वाटतो. याच पंक्तीत कुलदीपही सामील झाला आहे. संघात त्याला स्थान देण्यात आले ते विभागीय किंवा रोटेशन पद्धत म्हणून नव्हे तर यंदाच्या मोसमात आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून केलेल्या कामगिरीच्या जोरावर.
मूळचा मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात जन्मलेला कुलदीप एका हालाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातच लहानाचा मोठा झाला. घरची गरिबी, त्याचे वडील घर चालवण्यासाठी सलून चालवतात. या छोट्या गावात सलून ते असे किती चालणार पण तरीही त्यांनी कुलदीपच्या क्रिकेट कारकिर्दीला जमेल व शक्य असेल ती मदत केली व आज हा हिरा भारतीय संघाच्या कोंदणात चपखलपणे बसला. अर्थात तरीही त्याच्या वडिलांनी सलून बंद केलेले नाही. वयाच्या आठव्या वर्षीच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. रेवा क्रिकेट आकादमीने त्याला आपल्याकडे घेतले व कुलदीपचा एक सामान्य खेळाडू ते आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज असा प्रवास सुरू झाला. या अकादमीने त्याला मोफत प्रशिक्षण दिले.
त्याने मध्य प्रदेशकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळताना 14 सामन्यांमध्ये 43 बळी घेत आपली दखल देशातील समीक्षकांनाही घ्यायला भाग पाडले. याच कामगिरीच्या जोरावर त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले. मात्र, त्याच्या या यशाचे खरे श्रेय त्याचे रेवा येथील प्रशिक्षक एरियल अँथनी यांनाच द्यावे लागेल. कारण हा हिरा आज जगासमोर आला तो केवळ अँथनी यांनी पाडलेल्या पैलूंमुळेच हे विसरता कामा नये. राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने तसेच सपोर्ट स्टाफने मध्य प्रदेशच्या रणजी संघाच्या सराव सत्रात कुलदीपची गोलंदाजी पाहिली आणि आयपीएलच्या लिलावात त्याला 20 लाख या बेस प्राइजवर आपल्या संघासाठी खरेदी केले. या स्पर्धेत सुरुवातीपासून त्याला अंतिम संघात खेळण्याची संधीच मिळाली नव्हती.
मात्र, लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने पदार्पण केले व त्यातील कामगिरीमुळेच तो निवड समितीच्या नजरेत आला आणि त्याला न्यूझीलंडचा दौरा मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोनिस अफलातून फलंदाजी करत होता. त्यावेळी अखेरच्या षटकांत लखनौला विजयासाठी 15 धावांची गरज असताना कुलदीपने टाकलेले षटक स्वप्नवत ठरले. त्याने हा सामना राजस्थानला जिंकून दिला व त्याचक्षणी एका गुणवान क्रिकेटपटूचा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदय झाला.
राजस्थानचा गोलंदाजी प्रशिक्षक व श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसित मलिंगा यानेही चक्क उभे राहून टाळ्या वाजवत कुलदीपचे कौतुक केले. त्याच्या कामगिरीचा सूर्य न्यूझीलंडमध्ये तळपलेला दिसावा, हीच अपेक्षा.